| अलिबाग | प्रतिनिधी |
मानाचा आणि अभिमानाचा मानला जाणारा दहीहंडी उत्सव शनिवारी (दि.16) अलिबाग शहरात दुपारी तीन वाजल्यापासून रंगणार आहे. शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सव अलिबागमध्ये पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम विजेत्यांसह सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
दहीहंडी स्पर्धेसाठी 53 गोविंदा पथकाने नोंदणी केली आहे. त्यात महिला गोविंदा पथक 25 आणि पुरुष गोविंदा पथक 28 आहेत. दहीहंडी फोडणाऱ्या पुरुषांच्या अंतिम विजेत्या पथकाला प्रथम क्रमांकाचे रोख एक लाख 31 हजार 111 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये, सहा थराच्या सलामीला अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे. अंतिम विजेत्या महिला गोविंदा पथकाला प्रथम क्रमांकाचे 51 हजार 111 रुपये व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच चार थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकाला पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकाला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे.
दहीहंडी उत्सवानिमित्त रिल्स स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी 33 जणांनी नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले. अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांच्या स्मरणार्थ यावर्षी विशेष पारितोषिकांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग नगरपरिषद हद्दीतील पुरुष गोविंदा पथकाने दहीहंडी फोडल्यास त्या पथकाला एक लाख रुपये आणि महिला गोविंदा पथकाला 50 हजार रुपयांचे अतिरिक्त पारितोषिक देण्यात येणार आहे.





