शुक्रवारपासून मिनीट्रेन पुन्हा धावणार

तब्बल 15 दिवस उशिरा सुरू; दिवाळी पर्यटन आकर्षण ठरणार

| नेरळ | प्रतिनिधी |

जगभरातील पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन दि.15 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी सुट्टीवर जात असते. मात्र, यावर्षी मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक तब्बल 15 दिवस उशिरा सुरू होणार असून, शुक्रवार दि.30 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा नॅरोगेज रुळावर येणार आहे. दरम्यान, यंदा दिवाळी सुरू होण्याआधी मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू होत असल्याने माथेरानमधील व्यवसाय आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

1907 मध्ये ब्रिटिश काळात नेरळ जंक्शन स्थानकातून माथेरानसाठी मिनीट्रेन सुरू झाली. 21 किलोमीटर अंतरावर नॅरोगेज मार्गावर चालणारी मिनीट्रेन नेहमीप्रमाणे 15 जूनपासून पावसाळी सुट्टीवर गेलो होती; मात्र, नेहमीप्रमाणे दि.15 ऑक्टोबर रोजी सुरू होणारी प्रवासी वाहतूक यावर्षी अद्याप सुरू झालेली नाही. यावर्षी 15 सप्टेंबरपासून पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे मिनीट्रेनचा मार्ग सुस्थितीत आहे. परंतु, मध्य रेल्वेकडून या मार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे नेरळ-माथेरान मार्गावर प्रवासी सेवा सुरू होण्यात चालढकल सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. युनोस्को वर्ल्ड हेरिटेज ट्रेनमध्ये समाविष्ट असल्याने मिनीट्रेन आणखी आकर्षक बनवण्यात भर देण्यात येत आहे. दरम्यान, यावर्षी दि.15 ऑक्टोबर रोजी नेरळ-माथेरान मनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू झाली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. आता मात्र नेरळ-माथेरान या मार्गावरील पर्यटकांची आवडती टॉय ट्रेन सेवा शुक्रवार दि.30 नोव्हेंबरपासून पूर्ववत होत असल्याची माहिती मध्यरेल्वे कडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार नेरळ येथून दररोज सकाळी माथेरानसाठी दोन तर माथेरानवरून नेरळसाठी दुपारी दोन प्रवासी गाड्या सोडण्यात येणार आहेत. नेरळ येथून पहिली प्रवासी गाडी सकाळी 8.50 वाजता, तर दुसरी प्रवासी गाडी 10.25 वाजता माथेरानसाठी रवाना होणार आहे.

इंजिनाची दुरुस्ती रखडली
नेरळ येथील लोको कार्यशाळामध्ये एकूण आठ डिझेल इंजिन असून, त्यातील तीन इंजिन नादुरुस्त अवस्थेत होती. तर पाच इंजिनाची दुरुस्ती उशिरा झाल्याने यंदा 15 ऑक्टोबर रोजी मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान प्रवासी वाहतूक सुरू करता आली नाही.
नवीन गाड्यांची घोषणा नाही
यंदा मनीट्रेनच्या प्रवासी फेऱ्यांमध्ये कोणतीही वाढ होण्याची आशा मावळली आहे. गेल्या दोन वर्षांपासून नेरळ-माथेरान मार्गावर केवळ दोनच प्रवासी गाड्या चालवल्या जात आहेत. त्यात वाढ करण्याची अनेक वर्षांची मागणी मध्य रेल्वेकडून मान्य केली जात नाही.
Exit mobile version