पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम
| धाटाव | शशिकांत मोरे |
सध्या लग्न सराई जोरात असून यासारख्या वेगवेगळ्या सामुहिक कार्यक्रमात जेवणावळीसाठी वापरण्यात येणाऱ्या पळस, कुडा, मोहा सारख्या झाडांच्या पानांच्या पत्रावळ्या आणि द्रोण नामशेष झाल्याचे निदर्शनास येत आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या परिणामामुळे पानांच्या पत्रावळींची जागा आता थर्माकोल आणि कागदी पत्रावळीने घेतला आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यात जेवणावळीत वापरण्यात येणाऱ्या पानांच्या पत्रावळ्या आणि द्रोण ही परंपरा कालबाह्य होत असल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच, अधुनिक पत्रावळ्यांच्या अतिवारामुळे त्याचा विपरित परिणाम पर्यावरणासह मानवी आरोग्यावरही होत असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.
भारतीय संस्कृतीत पर्यावरण आणि निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकीकडे आपण आधुनिकीकरण आणि पाश्चत्य संस्कृती आत्मसात करीत असून आपल्या जीवनमानातून आणि संस्कृतीमधून हळूहळू दूर होत चाललो आहोत. त्यापैकी लग्न सराई किंवा इतर मोठ्या सोहळ्यात जेवणावळीत वापरल्या जाणाऱ्या पानाच्या पत्रावळी. सामुहीक किंवा वैयक्तिक धार्मिक कार्यक्रमात जेवणावळीसाठी ग्रामीण भागात शेजारची मंडळी कोणताही मोबदला न घेता नजीकच्या जंगलात जाऊन पळस, कुडा, मोह या झाडांची पाने तोडून आणून तिची चौकात बसून पत्रावळी तयार करून घेत असत. त्यामुळे ज्याच्यांकडे कार्यक्रम आहे, अशांना आर्थिक खर्चातून मोठा दिलासा मिळत असे. ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली असून आयुर्वेदीक साक्ष देखील देते. या पानाच्या पत्रावळी तयार करण्यासाठी लिंबाच्या किंवा बांबूच्या काड्याचा शिलक म्हणून वापर केला जात असे. अजूनही ग्रामीण भागात घरगुती कार्यक्रमात पानांच्या पत्रावळीत देवाला नैवेद्य मांडले जात आहे. पानांच्या पत्रावळीमुळे भोजनावळीची रांग देखील शोभून दिसत होती. मात्र, अलीकडे पानाच्या पत्रावळीऐवजी सर्रास थर्माकोल व कागदी पत्रावळीचा वापर अधिक होत असल्यामुळे दिवसेंदिवस हा सेवाभाव देखील समाजातून कमी होताना दिसत आहे.
सन 2018 पासून शासनाने थर्माकोलच्या पत्रावळ्यांवर बंदी घातल्यावर पुन्हा पारंपरिक व आरोग्यवर्धक अशा पानांच्या पत्रावळींना चांगले दिवस येतील, अशी आशा होती. परंतू, शासनाच्या कागदोपत्री बंदीवर हवातसा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. सामुहीक कार्यक्रमातून हजारो लोकांनापत्रावळीवर वाढण्यासाठी वाढप्यांना पंगत बसवावी लागते. त्यासाठी जास्त वेळ आणि मनुष्यबळ देखील लागते. त्यामुळे आधुनिक धावपळीच्या काळात पाश्चात्य बुफे पद्धत सोयीस्कर मानली जातो. लग्नात हजारो लोकांची गर्दी असते. बुफेमध्ये उभं राहून जेवण केले जाते. त्यामुळे पानाची पत्रावळीवर जेवण घेणं जिकरीचे ठरते. त्यामुळे त्याऐवजी प्लास्टिक, कागद किंवा थर्माकोलची ताट-वाट्या वापरल्या जातात. पूर्वी सहज उपलब्ध असणाऱ्या केळी व पळसाच्या पत्रावळींची जागा आता थर्माकोल आणि प्लास्टिकने घेतली आहे. यामुळे पर्यावरणासह मानवी आरोग्यालादेखील धोका निर्माण होत आहे.
कुटुंबावर उपासमारीची वेळ
जंगलालगतच्या गावांतील महिलांना पत्रावळीतून रोजगार मिळायचा. त्यांचा घरगुती लघु उद्योग असायचा. घरातील सर्व मंडळी पानाच्या पत्रावळी तयार करण्यास मदत करीत होते. लग्न समारंभ काळात चार पैसे कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. मात्र, या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शहरी भागात मोठमोठी मंगल कार्यालये, सभागृह तसेच ओपन स्पेसमध्ये कार्यक्रम आटोपल्यानंतर भोजनावळीत बफे पद्धतीत प्लास्टिकचे ताट, वाटी, ग्लास हमखास दिसून येतात. त्यामुळे आता हाच प्रकार ग्रामीण भागातही पाहायला मिळत आहे. पानाच्या पत्रावळीची जागा आता प्लास्टिक, कागद व थर्माकोल ताटांनी घेतली आहे. त्यामुळे हा कमी भांडवल असलेला लघु उद्योगही हरवला आहे.





