। उरण । प्रतिनिधी ।
यु.ई.एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सात दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. द्रोणागिरी हायस्कूल करंजा, उरण येथे दि.12 जानेवारी ते 18 जानेवारी कालावधीमध्ये हे शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये एकूण 52 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर यांनी एनएसएसच्या विद्यार्थ्यांना एकत्रित कामाचे महत्त्व सांगितले. या शिबिरामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मनोहर म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षण कसे करायचे, याचे प्रशिक्षण दिले. डॉ. सत्या ठाकरे यांचे करिअर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले आणि रिलायन्स ॲनिमेशन ॲण्ड मीडिया टीमद्वारे ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्सवर माहितीपूर्ण सत्र यांसारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले. तर हर्षद कोळी यांनी व्यवसाय कसा सुरू करावा, यावर व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांनी शाळेतील भिंतींवर चित्रकला (वॉल पेंटिंग) केली. तसेच स्वच्छ भारत, आपत्ती व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यावर सामाजिक जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. एनएसएस स्वयंसेवकांनी शाळेतील मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श तसेच इतर सामाजिक विषयांवर जागरूकतापर मार्गदर्शन केले. तर यु. ई. एस. संस्थेचे मानद सचिव ॲड. राजेंद्र भानुशाली यांनी जीवनविषयक तत्त्वज्ञान या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले.
सात दिवस चाललेल्या या निवासी शिबिरामुळे विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण होऊन, जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अजून सकारात्मक झाल्याचे दिसून आले.
यु.ई.एस. कॉलेजचे निवासी शिबीर संपन्न
