नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकर्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप असणारे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक करण्यात आलेली असून सध्या जेलमध्ये आहे. यामुळे अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडून वारंवार दबाव आणला जात आहे. यादरम्यान अजय मिश्रा यांनी पत्रकाराची कॉलर पकडल्याचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. इतकंच नाही तर त्यांनी तिथे उपस्थित प्रसारमाध्यांनाही शिवीगाळ केली.
अजय मिश्रा यांना नवीन चौकशी अहवालात त्यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात अजून गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते संतापले. यावेळी प्रश्न विचरणार्या पत्रकाराला त्यांनी हे असले मूर्ख प्रश्न विचारु नका. तुमचं डोकं फिरलं आहे का?, अशा शब्दात सुनावलं.