नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर या सर्व प्रकरणात भारताची भूमिका काय आहे याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. भारताची भूमिका या सर्व प्रकरणामध्ये फार महत्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा म्हणजेच सीआयएचे प्रमुख विलियम बर्न्स यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांची मंगळवारी दिल्लीमध्ये भेट घेतली. अधिकृत सुत्रांनी न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार डोवाल यांनी सीआयएचे प्रमुख बर्न्स यांची भेट घेतली असून या भेटीत बर्न्स यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य परतल्याने भारताकडून सहकार्याची अपेक्षा केली आहे.
भारताने क्षेत्रीय सुरक्षेसाठी गुप्त माहिती अमेरिकेसोबत शेअर करत एक मोठी जबाबदारी पार पाडावी असी अपेक्षा बर्न्स यांनी व्यक्त केलीय. भारताने वॉशिंग्टनसोबत जास्तीत जास्त माहिती शेअर करावी तसेच काही अफगाणी नागरिकांनाही आपल्या देशात आश्रय द्यावा अशी अमेरिकेची इच्छा आहे.
द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा अधिकारी या आठवड्यामध्ये दिल्लीच्या दौर्यावर आहेत. सीआयए प्रमुखांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन प्रतिनिधिमंडळ पाकिस्तानच्या दौर्यावरही जाणार आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार अमेरिकन अधिकार्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांच्यासोबत अफगाणिस्तान या विषयावर चर्चा केली.