| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गाजवली आहे. मेलबर्न कसोटीवरही जसप्रीतने दोन्ही डावांत 9 बळी घेतले होते आणि त्याचा त्याला फायदा झाला आहे. आयसीसीने बुधवारी (दि.1) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत जसप्रीतने त्याची अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. त्याचसोबत तो भारताकडून सर्वाधिक गुण मिळवणारा कसोटी गोलंदाज बनला आहे. जसप्रीतचे 907 रेटिंग गुण आहेत आणि त्याने माजी फिरकीपटू आर अश्विन (904) याचा डिसेंबर 2016 सालचा विक्रम मोडला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत हा 907 गुणांसह जागात इंग्लंडच्या डेरेक उंडरवूडसह संयुक्तपणे 17व्या क्रमांकावर आहे. बुमराहच्या कारकिर्दीत 2024 हे वर्ष महत्त्वाचे ठरले आहे. बुमराहने सर्वच फॉरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि त्यामुळे या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी निवडलेल्या 4 खेळाडूंमध्ये बुमराहचा समावेश करण्यात आला आहे.