। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय महिला फुटबॉल संघाने दि. 30 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात सामनावीर लिंडा कोम सेर्टोचे पदार्पणातील चार गोल तर प्यारी शाशाने अवघ्या आठ मिनिटांत केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर मालदीवचा 14-0 असा पराभव केला आहे. यासह भारताचे नवनियुक्त स्वीडन प्रशिक्षक जोकीम अलेक्झांडरसन यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात शानदार विजयाने केली.
मालदीव विरुद्ध दुसरा आणि शेवटचा मैत्रीपूर्ण सामना गुरूवारी (दि. 02) खेळवला जाणार आहे. प्रशिक्षक अलेक्झांडरसन यांनी आठ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली, त्यापैकी तीन खेळाडूंनी आक्रमणात उत्कृष्ट कामगिरी केली आणि आठ गोल केले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील भारतीय महिला संघाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी बांगलादेशमध्ये 2010 च्या चॅम्पियनशिपमध्ये संघाने भूतानचा 18-0 ने पराभव केला होता.