| पनवेल | वार्ताहर |
तपासणीसाठी कार थांबवलेल्या मोटार वाहन निरीक्षकाला धडक देऊन कारचालकाने पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात वाहन निरीक्षक मानसिंग खाडे (वय 45) हे किरकोळ जखमी झाले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून कारचालकाचा शोध सुरू आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग व जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरीता परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या विशेष तपासणी मोहिमेंतर्गत आरटीओचे वायुवेग पथक तयार करण्यात आले आहेत. वायुवेग पथक क्रं.2 मध्ये मोटार वाहन निरीक्षक मानसिंग खाडे व सहायक मोटार वाहन निरीक्षक निखिल जमदाडे यांना नेमण्यात आले आहे. त्यामुळे 1 मे रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास खाडे व जमदाडे हे आपल्या चालकासह गस्त घालत पनवेल येथील जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील शेडुंग टोलनाका येथे गेले हेते. त्यावेळी त्यांनी एका कारचालकाला थांबण्याचा इशारा केला, पण चालकाने कार न थांबवता निरीक्षकाला धडक देत पलायन केले.