| अलिबाग | प्रतिनिधी |
एखाद्या पीडीत मुलीला पोलिसांकडे जाऊन तक्रार करणे आजच्या काळातदेखील सोपे नाही. अलिबागमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. वयस्क व्यक्तीकडून एका 23 वर्षीय मुलीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला . अलिबाग पोलीस ठाण्यात ती तक्रार दाखल करण्यासाठी गेली. मात्र तिच्या आजूबाजूला असलेल्या मंडळींनी तिच्यावर दबाव आणल्याने तिला माघार घ्यावी लागली. विशेष म्हणजे पोलिसांनीही तिच्या पाठीशी उभे राहण्याचे सोडून शक्यतो तिने तक्रार करू नये असेच सुचविल्याचे दिसून आले.
अलिबागजवळच्या एका गावातील मुलगी खासगी संस्थेमध्ये नोकरी करीत आहे. तिच्या वरिष्ठाने तिच्या मोबाईलवर काही अश्लील फोटो पाठवले. या वरिष्ठाचे वय साठहून अधिक आहे. या घटनेने ती मुलगी घाबरली. तिने तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या मुलीला आजूबाजूला असलेल्या काही मंडळींनी तक्रार केल्यावर तुझीच बदनामी होईल. तुझे अजून लग्न झाले नाही. कोर्टातदेखील तुझे नाव येईल. अशा प्रकारे तिच्या मनात भिती निर्माण करून तिला तक्रार न दाखल करण्यास प्रवृत्त केलेे.
पोलीसांची काय भूमिका ?
पिडीत महिलेवर अत्याचार झाल्यावर तक्रारीला आल्यावर त्या मुलीला पोलिसांनी संरक्षण देणे आवश्यक असते. परंतु बुधवारी झालेल्या या प्रकारामुळे पोलीसांच्या भुमिकेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
पिडीत मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटना उजेडात आल्या पाहिजेत. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तसेच आजूबाजूला असलेल्या मंडळींनीदेखील तिला मदत करून ताकद दिली पाहिजे. अत्याचार हा तिचा वैयक्तीत गुन्हा असला, तरीही सामाजिक परिणाम दिसून येतो. अशा परिस्थितीत पोलिसांकडूनदेखील तिला संरक्षण मिळाले पाहिजे. संविधानाने महिला सुरक्षेचे कायदे उभे केले आहेत. त्या कायद्याद्वारे अत्याचार करणाऱ्याला शिक्षा व्हायला हवी.
उल्का महाजन – सामाजिक कार्यकर्त्या