बेडीसगावचा मतदार रात्रभर रांगेत

रात्री आठपर्यंत बजावला मतदानाचा हक्क

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथील मतदार राजा रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावताना दिसला. बेडीसगाव हे भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागात असल्यामुळे या ठिकाणी पोहोचेपर्यंत मतदारांची दमछाक होताना दिसली. त्यातच याठिकाणी एकच मतदान केंद्र असल्यामुळे मतदारांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे मतदारांना रात्रभर रांगेत उभे राहावे लागले. त्यामुळे त्यांच्यातून संताप देखील व्यक्त करण्यात आला.

कर्जत तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडीसगाव येथे मतदानाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मात्र, एकाच मतदान केंद्रामुळे मतदारांना रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत रांगेत उभे राहावे लागले. बेडीसगाव हे भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागात असून या केंद्रावर एकूण 1,159 मतदार आहेत. येथील वाड्या एकमेकांपासून दूर अंतरावर असल्याने आणि संपूर्ण गावांसाठी केवळ एकच मतदान केंद्र असल्याने शाळेच्या वाडीतील केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभर सुरू असलेली ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. बेडीसगाव हा दुर्गम भाग असूनही या केंद्रावर 82.31 टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे.

यादरम्यान, तासनतास रांगेत उभे राहावे लागल्याने मतदार राजाने निवडणूक आयोगाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कर्जत उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड आणि नेरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी स्वतः केंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव हे देखील या केंद्रावरील घडामोडींची वेळोवेळी माहिती घेत होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर रात्री 8 वाजता मतदानाची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. यावेळी एकूण 1,159 मतदारांपैकी 954 मतदारांनी आपला हक्क बजावला.

Exit mobile version