कालव्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा कायम

प्रशासनाचा बेजबाबदार पणा उघड; गेली तीन वर्षे दुरूस्तीची कामे सुरूच

| धाटाव | प्रतिनिधी |

आंबेवाडी ते निवी कालव्यात गेली कित्येक वर्षे पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा परिणाम येथील शेती व पर्यावरणावर झाला आहे. या कालव्यात पाणी सोडण्यासाठी बळीराजा फांऊडेशनच्यावतीने सातत्यपूर्ण आक्रमक लढा देण्यात आला आहे. त्यांनंतर संबंधित प्रशासनाकडून करोडोंचा निधी खर्चून कालव्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले. परंतु, गेली तीन वर्षे या कालव्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असून काही प्रमुख कामे पुर्ण झाली आहेत. तरी देखील आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी प्रतिक्षा कायमच राहिली आहे. संबंधित प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे बळीराजा फाऊंडेशन तर्फे संबंधित प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

आंबेवाडी ते निवी कालव्यात गेली कित्येक वर्षे पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील शेतकरी, लघु उद्योजक व पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली प्रशासनानेच बंद केलेल्या कालव्याची दुरुस्ती करावी, कालव्याला पूर्वापार पाणी सोडण्यात यावे यासाठी बळीराजा फांऊडेशने शर्तीचा लढा उभा केला. उपोषण, विविध आंदोलने केली. अखेर कालवा दुरुस्ती कामाला प्रारंभ झाले. कालव्याची दुरुस्ती कामे व्हावीत, कालवा पूर्ववत व्हावा यासाठी आजतागायत पाटबंधारे प्रशासनाला सामंजस वेळ दिला. तरीही तीन वर्षे लोटली तरी कालव्याची दुरुस्ती सुरूच आहे. या दुरुस्तीच्या कामांत महत्त्वाचे एस्कॅप, सायपन, साकाव व पोट कालव्यांची मोठी कामे झाली आहेत. तरीदेखील कालव्यात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरूच करण्यात आलेली नाही. वाशी, लांढर, तळाघर, निवी हद्दीतीलही कालव्याची व पोट कालव्याची कामे अक्षरशः धीम्यागतीने उरकण्यात आली. तळाघर, निवी व इतरत्र कालव्याची अजून साफसफाईच नाही. धीमे ठेकेदार व बेफीकीर अधिकाऱ्यांमुळे कालव्याला पाणी सोडण्यासाठी प्रचंड दिरंगाई झाली आहे. अशातच आता मार्च महिना उजाडला तरी कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. पावसाळा सुरू झाल्यावर पाणी सोडणार का, असा संतप्त प्रश्न शेतकरी व ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

पाटबंधारे विभाग प्रशासनाच्या निरर्थक नियोजनाचे पुन्हा ग्रामस्थांना दर्शन झाले आहे. यावर कार्य अभियंता मिलिंद पवार हे नेहमीप्रमाणे टोलवाटोलवी करण्यातच आघाडीवर राहिले आहेत. सूचना दिल्या आहेत, चर्चा करू हेच वाक्य त्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. ते कायम ठेकेदारांना सवलत देत आले आहेत. त्यामुळे बळीराजा फांऊडेशनसह शेतकरी व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, फांऊडेशन तर्फे गुरूवारी कोलाडच्या पाटबंधारे विभाग कार्यालयावर धडक देऊन संबंधीतांना जाब विचारण्याचे जाहिर करताच एकच खळबळ उडाली होती. आता कालव्याला पाणी सोडण्याबाबत बळीराजा फाऊंडेशन काय पवित्रा घेतो. अधिकाऱ्यांना कितपत धारेवर धरतात? याकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आंदोलनाचा इशारा
कालव्याच्या कामावर आत्तापर्यंत करोडो रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. त्याची जाणीव अधिकाऱ्यांना का नाही? पाणी सोडण्याचा उद्देश पूर्ण का केला जात नाही? असा सवाल करत पाणी सोडण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अन्यथा पुन्हा आंदोलन उभे करू, असा इशारा बळीराजा फांऊडेशनने पाठबंधारे प्रशासनाला दिला आहे.

आंबेवाडी ते निवी कालव्याची दुरुस्ती कामे अशंत: पूर्णत्वास गेली आहेत. तरीही पाणी सोडण्याच्या नियोजनातील अनेक ठिकाणी कालवा साफसफाईला अजून प्रारंभच नाही. अक्षरशः निरर्थक नियोजन आहे.

विठ्ठल मोरे,
अध्यक्ष, बळीराजा फाऊंडेशन
Exit mobile version