भास्कर खंडागळे
हिमालयाच्या भारतीय बाजुला सुमारे 9975 हिमखंड आहेत. त्यापैकी 900 उत्तराखंडमध्ये येतात. देशातील चाळीस टक्के लोकसंख्येला पिण्याचे पाणी, सिंचन आणि उपजीविकेसाठी संसाधने उपलब्ध करून देणार्या या हिमनद्यांमधून बहुतांश नदया उगम पावल्या आहेत; पण हिमनग वितळण्याची, तुटण्याची प्रवृत्ती कायम राहिली, तर प्रचंड लोकसंख्येला रोजगार आणि उपजीविकेची पर्यायी साधने उपलब्ध करून देण्याचा पर्याय देशाकडे नाही.
पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे हिमखंड तुटण्याची प्रक्रिया चालू राहिल्यास समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल, यामुळे अनेक लहान बेटे आणि किनारपट्टीवरील शहरे बुडू लागतील. या घटना नैसर्गिक मानल्या जातात की हवामान बदलाचा परिणाम आहेत, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये अद्याप एकमत नाही. तापमानात वाढ झाल्यामुळे जगभरातील हिमनद्या अतिशय वेगाने वितळत आहेत. त्यामुळे सर्व हिमनदी प्रदेशात नवीन सरोवरे तयार होत आहेत. या सरोवरांच्या क्षेत्रात उद्रेकाची घटना घडल्यास हिमनगांच्या पन्नास किलोमीटरच्या परिघात राहणार्या जगातील 15 कोटी लोकांसाठी मोठा धोका ठरू शकतो. यापैकी निम्मे हिमखंड भारत, पाकिस्तान, चीन आणि पेरूमध्ये आहेत. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ब्रिटनमधील ‘न्यूकॅसल युनिव्हर्सिटी’ च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, जगातील 50 टक्के लोकसंख्या धोक्यात आहे. म्हणजे 75 लाख लोक भारतासह या चार देशांमध्ये राहतात. भारतातील 30 लाख आणि पाकिस्तानातील 20 लाख लोकांना याचा फटका बसू शकतो. या अहवालात फेब्रुवारी 2021 मध्ये उत्तराखंडमधील चमोली येथे घडलेल्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. हवामानबदलाचा सर्वात मोठा धोका तिबेटच्या पठारापासून चीनपर्यंत आहे. या भागात 93 लाख लोक राहतात. ध्रुवीय क्षेत्राबाहेरील एकूण हिमनद्यांपैकी निम्मे पाकिस्तानात आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान भागात 2022 मध्ये हिमनदी फुटण्याच्या सोळा घटना घडल्या आहेत; मात्र 2022 मध्ये पाकिस्तानात आलेल्या पुरासाठी हिमखंड वितळणे किती जबाबदार आहे, हे या अहवालात स्पष्ट झालेले नाही.
न्यूझीलंडच्या ‘कँटरबरी युनिव्हर्सिटी’चे प्रोफेसर टॉम रॉबिन्सन म्हणतात की हिमनदी सरोवराचा उद्रेक हा जमिनीच्या त्सुनामीसारखा आहे. त्याचा परिणाम धरण फुटल्यावर निर्माण होणार्या परिस्थितीसारखा आहे. त्याचा सर्वात मोठा धोका हा आहे की, हे संकट कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय मोठे नुकसान करू शकते. हवामानबदलाच्या परिणामामुळे बर्फ वितळल्यामुळे तयार झालेल्या सरोवरांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात त्यांच्या पाणलोट क्षेत्रातील लोकसंख्याही वाढत आहे. तलाव फुटल्यामुळे तितका धोका नसून या तलावांजवळ लोकसंख्येच्या वाढत्या दबावामुळे फारसा धोका नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. भारताच्या हिमालयीन प्रदेशात असलेल्या सतलज नदीच्या खोर्यातील हिमनद्या वितळल्यामुळे अशा तलावांची संख्या वाढत आहे, जी भविष्यात पूर आणि विनाशाचा मोठा धोका बनू शकतात. या बर्फाळ मैदानात 273 नवीन तलाव तयार झाले आहेत. मानसरोवर ते नाथपा झाकडी भागापर्यंत एकूण 1632 तलावांची मोजणी करण्यात आली आहे. यापैकी 17 तलाव धोक्याच्या चिन्हावर पोहोचले आहेत. त्यापैकी आठ चीनव्याप्त तिबेट प्रदेशात आहेत. त्यांचे क्षेत्र पाच हेक्टरपर्यंत आहे. या तलावांमुळे सतलजचे पाणी वाढून मोठी हानी होऊ शकते. म्हणूनच ही सरोवरे हिमाचल प्रदेश आणि इतर हिमालयीन राज्यांसाठी धोक्याची घंटा आहेत.
हिमालयातील चिनाब, बियास, रावी आणि सतलज या चार खोर्यांमधील हिमनद्या वितळल्याने तयार झालेल्या सरोवरांचं निरीक्षण करण्यात देश आणि राज्यातील भूवैज्ञानिक गुंतले आहेत. सतलज नदीच्या खोर्यातील हिमनद्या वितळल्यामुळे तलावांमधील पाण्याचे प्रमाण चार ते पाच टक्क्यांनी वाढल्याचे त्यांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. भविष्यात त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. वाढत्या तापमानामुळे हिमखंड वितळणे आणि तुटणे यामुळे तलावांचा आकार वाढत आहे. 2005 मध्ये परचू तलाव भूस्खलनाने फुटला होता. परिणामी, सतलजच्या पाण्याची पातळी वाढली आणि हिमाचल प्रदेशमधील किन्नौर आणि बिलासपूर जिल्ह्यात कहर झाला. काही काळापूर्वी गोमुखाच्या प्रचंड हिमखंडाचा काही भाग तुटून भगीरथीवर म्हणजेच गंगा नदीच्या उगमस्थानावर पडला. अशा प्रकारे हिमालयातील हिमनद्या वितळणे आणि तुटणे अशुभ आहे. ‘गंगोत्री नॅशनल पार्क’च्या वन अधिकार्र्यांनी हिमखंडाच्या तुकड्यांची छायाचित्रं दाखवत ते तुटल्याची पुष्टी केली होती. अशा प्रकारच्या महापुराचे संकेत उत्तराखंड ‘स्पेस ऍप्लिकेशन सेंटर एमपीएस’ आणि ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी’चे संचालक आणि भूवैज्ञानिक यांनी चाळीस वर्षांपूर्वी एका संशोधनात दिले होते. या संशोधनानुसार, ऋषी गंगा पाणलोट क्षेत्रातील आठहून अधिक हिमनद्या सामान्यपेक्षा वेगाने वितळत आहेत. साहजिकच यापेक्षा जास्त पाणी वाहून गेल्यास हिमनग तुटण्याच्या घटना वाढणे स्वाभाविक आहे.
या हिमनगांमधून वाहणार्या पाण्याचा दाब एकट्या ऋषीगंगेवर होता. हे पाणी पुढे जाऊन धौलीगंगा, विष्णू गंगा, अलकनंदा आणि भगीरथी गंगामध्ये वाहते. या सर्व गंगेच्या उपनद्या आहेत. त्यामुळंच ‘युनेस्को’नंही हा संपूर्ण परिसर संरक्षित घोषित केला आहे. येथे 6500 मीटर उंच हिमालयीन शिखरे आहेत. हजारो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे तयार झाल्यानंतर या उंच शिखरांवर तुटून पडणारे हिमखंड अत्यंत जीवघेणे ठरतात. 1970 ते 2021 या काळात या भागात केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे की, गेल्या चाळीस वर्षांमध्ये आठ हिमनग वितळले आहेत. त्यांचा आकार 26 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे तर व्यास 26 किलोमीटर इतका कमी झाला आहे. या घटनांची पार्श्वभूमी कमी बर्फवृष्टीसह पृथ्वीचे वाढलेले तापमान असल्याचे हिमनद्यशास्त्रज्ञांचे मत आहे. सतलज आणि नंदादेवी हिमनद्या झपाट्याने वितळण्यामागे भौगोलिक परिस्थिती आहे. येथील तापमान 0.5 डिग्री सेल्सियसने वाढले असून या भागात तीस टक्के पाऊस कमी होतो. कालांतराने पृथ्वीवरील उष्णता वाढत राहिली आणि हिमनद्यांची धूप होत राहिली, तर त्याचा परिणाम समुद्राची पातळी वाढण्यावर आणि नद्यांच्या अस्तित्वावर होणार हे निश्चित. पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे हिमखंड तुटण्याची प्रक्रिया पुढे चालू राहिल्यास समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. त्यामुळे अनेक लहान बेटं आणि किनारपट्टीवरील शहरे बुडू लागतील. या घटना नैसर्गिक मानल्या जातात की हवामानबदलाचा परिणाम म्हणून शास्त्रज्ञ अद्याप निर्णय घेऊ शकले नाहीत, हे समजून घेण्याची गरज आहे.
शास्त्रज्ञ हिमखंड वितळण्याच्या आणि तुटण्याच्या घटनांना सामान्य मानत होते. कमी बर्फवृष्टी आणि जास्त उष्णतेमुळे हिमखंडांमध्ये भेगा पडल्या. पावसाचे पाणी तुंबल्याने हिमखंड तुटू लागले, असे त्यांचे मत होते. उत्तराखंडच्या जंगलांमध्ये दर वर्षी लागणार्या आगीमुळे हिमनग कमकुवत करण्याचे काम झाले आहे. ज्वाला आणि धुरामुळे बर्फाळ खडकांवरील गोठलेला बर्फ वेगाने वितळत गेला. त्यामुळे तडे भरता आले नाहीत. खडकांवर कार्बन साठून राहिल्यास भविष्यात नवीन बर्फ तयार होण्याची अपेक्षा कमी होते. अलीकडे काश्मीर खोर्यात मोठ्या प्रमाणात पिवळा बर्फ दिसत आहे. याआधीही या भागात काळा बर्फ आणि काळा पाऊस पहायला मिळाला होता. बर्फाच्या रंगात हा बदल का झाला, हे पर्यावरणवाद्यांना नीट शोधता आलेले नाही. कदाचित ते हवामान बदलामुळे असेल. त्यामुळे हिमखंड तुटणे ही नवी बाब नाही; परंतु त्यांचे वितळणे ही नवी बाब आहे. शतकानुशतके हिमखंड वितळण्याचे नैसर्गिक स्वरूप नद्यांचे प्रवाह सतत तयार करत आहे; मात्र जागतिकीकरणानंतर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोषणावर आधारित औद्योगिक विकास, त्यातून उत्सर्जित होणारा कार्बन यामुळे त्यांच्या वितळण्याची तीव्रता वाढली आहे. एक शतकापूर्वीही हिमखंड वितळत असत; परंतु हिमवर्षावानंतर त्यांची व्याप्ती सतत वाढत गेली. त्यामुळे गंगा, यमुना या नद्या वाहत राहिल्या. 1950 पासून त्यांची श्रेणी वर्षाला तीन ते चार मीटरने कमी होऊ लागली. 1990 नंतर हा वेग अधिक वाढला, तेव्हापासून गंगोत्रीतील हिमनद्या दर वर्षी पाच ते वीस मीटर वेगाने वितळत आहेत. हे टाळण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात.