योद्धा हे पेणकरांचे खेळचरित्र दीपस्तंभ ठरेल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
योद्धा हे भारत श्री आणि कबड्डीपटू विजू पेणकर यांचे खेळचरित्र संघर्ष करणार्‍या प्रत्येक खेळाडूसाठी दीपस्तंभाचे काम करेल. खेळातीलउत्यांचे कर्तृत्व स्फूर्तिदायक आहे. प्रत्येक खेळाडूपर्यंत हे खेळचरित्र पोहचले पाहिजे असे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काढले. सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण लिखित योद्धा या खेळचरित्राचे उद्घाटन मुंबईत एका शानदार समारंभात झाले, त्यावेळी ते बोलत होते. माझगावच्या सर एली कदुरी शाळेतील प्रांगणात हा सोहळा रंगला. या सोहळ्यास व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, आ.रवींद्र वायकर, आ.शशिकांत शिंदे, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, इंडियन ज्युईश फेडरेशनचे अध्यक्ष जोनाथन सॉलोमन, प्रकाशक प्रज्ञा जांभेकर, आयोजक राल्फ पेणकर तसेच अनेक अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू उपस्थित होते.

विजू पेणकरांसारख्या कबड्डीतील अनेक दिग्गज खेळाडूंच्या आठवणी दृष्य माध्यामात जतन केल्यास येणार्‍या पिढीस त्या मार्गदर्शक ठरतील. कबड्डी संघटनेने यासाठी पुढाकार घ्यावा या लेखक संदीप चव्हाण यांच्या मागणीची दखल घेत याचा पाठपुरावा सरकारी पातळीवर आपण नक्की करू असे आश्‍वासन धनंजय मुंडे यांनी दिले. पेणकर खरे योद्धा आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते होतेय हे मी माझे भाग्य समजतो असेही ते म्हणाले. आपल्या प्रत्येकाचा रोज जगण्यासाठी संघर्ष असतो. या संघर्षात जिथे तुमची हिंमत संपेल असे वाटेल त्या प्रत्येक अवघड वळणावर योद्धा हे पुस्तक तुम्हाला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल असे विजू पेणकर म्हणाले. या पुस्तकासाठी पन्नास वर्षापूर्वी घडलेल्या घटनांची माहिती आणि फोटो संकलित करणे अवघड होते. तब्बल दोन वर्ष त्यासाठी मेहनत घेतली. गरिबीचे चटके सोसून, अनेक संकटांचा मुकाबला करत यश मिळवणार्‍या पेणकरांचे हे खेळ चरित्र अनेकांना प्रेरणादायी ठरेल असा विश्‍वास संदीप चव्हाण यांनी व्यक्त केला. सदामंगल प्रकाशनाने आजवर अनेक पुरस्कार प्राप्त पुस्तकांची निर्मिती केली आहे. पण योद्धा हे पहिलेच खेळावरील पुस्तक आहे. त्याला चांगाला प्रतिसाद मिळेल अशी आशा प्रकाशक प्रज्ञा जांभेकर यांनी व्यक्त केली. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन लेबाना पेणकर यांनी केले.

Exit mobile version