मानकुळेतील पाणीप्रश्‍न पेटला

महिलांसह ग्रामस्थ आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जलजीवन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार अशा बाता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कायम मारत आला आहे. मात्र, आजही मानकुळेतील हजारो नागरिकांसह महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या गावांमधील पाणीप्रश्‍न पेटला असून, महिलांसह ग्रामस्थांनी आक्रमक होत मंगळवारी (दि.3) अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला.

अलिबाग तालुक्यातील मानकुळे, बहिरीचापाडा, नारंगीचा टेप, बंगला बंदर, गणेशपट्टी ही गावे खाडी किनारी असून, येथील असंख्य नागरिक मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. सुमारे साडेतीन हजार लोकवस्ती असलेल्या या गावांमधील नागरिकांना एमआयडीसीद्वारे पाणी देण्यासाठी तीन टाक्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या काही महिन्यांपासून लाखो रुपये किमतीचे जलजीवन योजनेचे काम सुरु केले आहे. पाईप टाकण्यात आले आहे. परंतु, अजूनपर्यंत पाण्याचा थेंबही या गावांतील नागरिकांना मिळालेला नाही. या भागात एमआयडीसीच्या आठ लाईन आहेत. मात्र, पाण्याचा थांगपत्ताच नसल्याचे सांगण्यात आले आहे. एमआयडीसीचे पाणी वेळेवर येत नाही. त्यामुळे रात्री आठ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत पाण्यासाठी वाट पाहावी लागते. एक हंडा मिळविण्यासाठी एक तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे. पाण्यासाठी रात्र जागून घालवावी लागत असल्याने महिलावर्गामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. पाण्याचे नळ गावापासून एक किलोमीटर अंतरावर दूर असल्याने महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे महिलांना रात्रीच्यावेळी पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्‍नदेखील गंभीर होऊ लागला आहे. मानकुळे येथे पाण्याच्या अनेक योजना राबविल्या आहेत. परंतु, आजही या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी जलजीवन योजनेचे काम करण्यात आले आहे. पाईट टाकण्यात आले आहे. परंतु, घरांना पाणी अद्यापही मिळाले नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मानकुळे येथील पाणीप्रश्‍न पेटला असून, येथील शेकडो महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला. हातात, डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पावसाचा हंगाम संपून एकच महिना पूर्ण झाला असताना आता ही परिस्थिती आहे, तर मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत कसा निभाव लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version