कासाडी नदीवर विकासकांचा घाला

दूषित रंग अन्‌‍‍ दुर्गंधीचे साम्राज्य; स्थानिकांचे आरोग्य धोक्यात

| खांदेश्वर | प्रतिनिधी |

पनवेल आणि तळोजा एमआयडीसी परिसरातून वाहणाऱ्या कासाडी नदीच्या परिसरात सिडकोतर्फे अनेक विकास कामांसह मोठमोठ्या इमारती आणि नागरी वसाहती बांधल्या जात आहेत. तसेच, तळोजा औद्योगिक वसाहतीचा विस्तार होत असताना उद्योगधंद्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे नदीपात्र परिसर धोक्यात आला आहे. तसेच, येथील नागरी आणि औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी थेड कासाडी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी नदीचा रंग बदलला असून, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच, प्रदूषित पाण्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे.

पनवेल आणि तळोजा एमआयडीसी परिसरातून वाहणाऱ्या कासाडी नदीच्या उगमस्थानी स्वच्छ आणि निर्मळ पाणी असते. परंतु, ती या परिसरातून वाहताना तिच्या शेवटापर्यंत तिचा रंग बदलल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक वर्षांपासून कासाडी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदीच्या पाण्याचा बदललेला रंग, परिसरात पसरणारी तीव्र दुर्गंधी आणि पाण्यातून निर्माण होणारे प्रदूषण यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नदीकडे पाहिल्यानंतर ती नैसर्गिक जलस्रोत आहे की औद्योगिक सांडपाण्याचा प्रवाह, असा प्रश्न उपस्थित होतो. कासाडी नदी प्रदूषण रोखण्यासाठी वेळोवेळी पाहणी, बैठका आणि उपाययोजनांची चर्चा झाली. परंतु, प्रत्यक्षात मात्र नदीच्या पाण्याचा रंग आणि दुर्गंधीचा प्रश्न कायम असल्याचे चित्र नागरिक मांडत आहेत.

नदी म्हणजे केवळ वाहणारे पाणी नव्हे, तर ती परिसरातील पर्यावरणाची जीवनवाहिनी असते. तिच्यावर अनेक जलचर, पक्षी आणि नैसर्गिक परिसंस्था अवलंबून असतात. नदी प्रदूषित झाली तर त्याचा परिणाम केवळ पाण्यावर होत नाही, तर संपूर्ण पर्यावरणावर होतो. त्यामुळे कासाडी नदीचे प्रदूषण हा केवळ एका नदीचा प्रश्न राहिलेला नाही, तर भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. दरम्यान, या परिसरात विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. एकीकडे कासाडी नदीच्या परिसरात सिडको प्रशासनाकडून मोठंमोठ्या इमारती आणि नागरी वसाहती उभ्या राहत आहेत. पुलाच्या बाजूलाच उंच इमारतींचे जाळे विस्तारत आहे. तसेच, तळोजा औद्योगिक वसाहतीचा विस्तार होत असताना उद्योगधंद्यांची संख्या देखील वाढली आहे. भविष्यात या परिसरात विकासाच्या उंच इमारती दिसतील; मात्र, त्याचवेळी नदीचे अस्तित्व केवळ नकाशावरच उरेल की काय, अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, प्रशासनाने नदीच्या उगमापासून ते अंतिम टप्प्यापर्यंत पाण्याची गुणवत्ता तपासावी, प्रदूषणाचे स्रोत शोधावेत, सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणांची तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, कासाडी नदीच्या संरक्षणासाठी नेमकी कोणती ठोस पावले उचलली गेली? प्रदूषण करणाऱ्या घटकांवर किती कारवाई झाली आणि आजपर्यंत किती निधी खर्च झाला, याचा हिशेब प्रशासनाने जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. केवळ बैठका आणि आश्वासनांनी नदीचे प्रदूषण थांबणार आहे का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा
‌‘नदी वाचवा, पर्यावरण‌’ राखा हे घोषवाक्य केवळ जागतिक पर्यावरण दिनापुरते मर्यादित राहू नये. कासाडी नदीला पुन्हा तिचा नैसर्गिक रंग मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आता तरी ठोस कृती करावी. तळोजा एमआयडीसी परिसरातून वाहणाऱ्या कासाडी नदीच्या पाण्याचा बदललेला रंग, पुलाच्या बाजूला उभ्या राहत असलेल्या उंच इमारती आणि विकासाच्या झगमगाटात नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून, प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.
Exit mobile version