खालापुरात दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज ठप्प

। खोपोली । प्रतिनिधी ।
जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार व सदनिका खरेदी विक्रीचे व्यवहार सध्या तेजीत आहेत. मात्र खालापूर दुय्यम निबंधक कार्यालय येथील काम गेले आठ दिवस इंटरनेट सेवा नसल्याकारणाने जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून येथील खरेदी व विक्री करणार्‍या नागरिकांना व सदनिका धारकांना मोठ्या समस्यांना व अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
खालापूर तालुक्यात मागील 12 वर्षापासून दुय्यम निबंधक कार्यालायाची सेवा ही अखंडितपणे सुरू होती, मात्र खालापूर ते खोपोली या दरम्यान मुंबई पुणे जुना महामार्गावरील नॅशनल हायवे रस्त्याचे काम करीत असल्याने भारतीय दूरसंचार निगम ची केेेबल रस्त्याच्या कामामध्ये तोडली जात असल्याने या खोदकामाचा परिणाम कार्यालयांना बसला आहे. असाच परिणाम म्हणजे खालापूर दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याने तेथील शासनाला व खरेदी-विक्री करणार्‍या नागरिकांना देखील मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे दुय्यम निबंधक अधिकारी श्रीमती पवार यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की महामार्गाचे काम सुरू असल्याकारणाने जांबरून फाटा येथे खोदकाम करत असताना लाईन जेसीबी मशिनच्या सहाय्याने तोडण्यात आली.
दुय्यम निबंधक अधिकारी यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन सूचना केल्या ही सेवा अखंडितपणे सुरू होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावी अशी विनंती केली. वरिष्ठ अधिकार्‍यांना कार्यालयाची सेवा बंद असल्याचे लेखी स्वरूपात कळविले मात्र बीएसएनएलचे अडवणुकीची भुमिका असून वायर कमी असल्याचा बहाणा देत कर्जत येथून वायर आणू नंतर सेवा सुरू केली जाईल असे उडवाउडवीचे उत्तर दिले, दरम्यान इंटरनेट सेवा बंद असल्याने तालुक्यातील शासकीय कार्यालयातील सर्व काम ठप्प झाले असून सर्व कामे ठप्प झाले असून बीएसएनएल आणि निबंधक खालापुर कार्यालय यांच्या धोरणामुळे सामान्यांचे हाल होत आहेत.

Exit mobile version