नळपाणी योजनेचे काम संथगतीने

जुम्मापट्टी जलकुंभाचे काम रखडले

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी नळपाणी योजना राबविली जात असलेल्या नेरळ वाढीव नळपाणी योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. त्यामुळे या नळपाणी योजनेतील आदिवासी भागासाठी असलेल्या जलकुंभाचे काम रखडले आहे. या नळपाणी योजनेसाठी 50 कोटींचा खर्च करण्यात येत असून या योजनेच्या कामाबद्दल भीती निर्माण झाली आहे. अडीच वर्षांचा कालावधी लोटला तरी नळपाणी योजनेच्या कामाला पाहिजे तशी गती मिळत नसुन ही नळपाणी योजना कधी पूर्ण होणार, याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम कायम आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. 2023मध्ये या नळपाणी योजनेच्या कामाला सुरुवात झाली होती. या योजनेचे काम सुरु झाल्यापासून नेरळ गावात पाण्याची टंचाई सुरु झाली. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील अनेक भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे संबंधित ठेकेदार कंपनी आपल्या मनमर्जीप्रमाणे कामे करीत आहे. त्यामुळे यावर्षीदेखील नेरळ नळपाणी योजनेचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच संबंधित ठेकेदार नळपाणी योजनेच्या जलकुंभांचे काम पूर्ण करण्याची घाई देखील करीत नाही. नेरळ ग्रामपंचायत देखील कोणताच हस्तक्षेप घेत नसल्याकारणाने ठेकेदारावर कोणता अंकुश राहिला नसल्याने स्थानिकांकडून प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

जलकुंभांची कामे अनेक महिने बंदच
आदिवासी वाड्यांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी नेरळ नळपाणी योजनेचे एक जलकुंभ जुम्मापट्टी तर दुसरे जलकुंभ आनंदवाडी येथे बांधण्यात येत आहे. मात्र, या दोन्ही जलकुंभांची कामे अनेक महिने बंदच आहे. त्या योजनेचे काम पूर्ण करून घेण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत देखील पुढाकार घेत नाही आणि त्यामुळे ठेकेदारावर कोणाचाही अंकुश राहिलेला नसल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
ठेकेदाराला आयते कोलीत
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पनवेल येथील कार्यालयात बसणार्‍या अधिकार्‍यांकडे या योजनेचे काम पूर्ण करून घेण्याचे जबाबदारी आहे. मात्र, अधिकारी वर्ग नेरळ नळपाणी योजनेचे काम बघायला देखील येत नाहीत. त्यामुळे ठेकेदाराला आयते कोलीत मिळाले असून या नळपाणी योजनेचे काम कुठवर पूर्ण झाले आहे, त्याची कोणतीही माहिती नेरळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध नाही. परिणामी नेरळ नळपाणी योजना पूर्ण होण्यासाठी 2026 उजाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Exit mobile version