। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ प्रादेशिक नळपाणी योजना मधील एक जलकुंभ जुम्मापट्टी येथे नियोजित करण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी जलकुंभ बांधण्यासाठी सहा महिन्यपूर्वी खोदकाम करण्यात आले होते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम सहा महिन्यात पुढे जाऊ शकले नाही. नळपाणी जलकुंभाचे बांधकाम रखडले असल्याने नेरळ नळपाणी योजनेचे काम देखील रेंगाळले असून त्यामुळे नेरळ ग्रामस्थांचे तोंडाचे पाणी पळाले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून नेरळ नळपाणी योजनेच्या कामाचा ठेका मार्च 2023 रोजी देण्यात आला आहे. या नळपाणी योजनेमध्ये पाणी साठवण टाक्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधल्या जाणार आहेत. मात्र सव्वा वर्षात नेरळ गावात उभारण्यात येणार्या नळपाणी योजनेमधील एकही जलकुंभाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.
जुम्मापट्टी येथे जलकुंभ बांधले जाणार असून तेथे असलेल्या लोकवस्तीच्या तुलनेत कमी लिटर क्षमतेची साठवण टाकी मंजूर केली आहे. जुम्मापट्टी येथील पाण्याचे जलकुंभ हे 25 हजार लिटर क्षमतेचे आहे. मात्र तेथील लोकवस्ती लक्षात घेता येथील पाण्याचे जलकुंभ हे किमान दीड ते दोन लाख लिटर क्षमता असायला हवी होती अशी सूचना ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुनील पारधी यांनी केली आहे.