उरण-नेरुळ रेल्वे मार्गाच्या कामाला मिळणार गती

| उरण । वार्ताहर ।

नेरूळ ते उरण रेल्वेसाठी जासई येथील 32 शेतकर्‍यांच्या सिडकोने 22 वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदल्यात साडेबारा टक्के भूखंड दिले नसल्याने शेतकर्‍यांनी रेल्वेचे काम बंद केले होते. मात्र, मंगळवारी दुपारनंतर पोलिस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे उरण ते नेरूळ रेल्वे प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली आहे.

खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम जानेवारी 2023 ला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या मार्गाच्या कामाने सध्या वेग धरला आहे. सुरुवातीला खारकोपर ते उरण हा 14.3 किलोमीटरच्या मार्गाचे काम भूसंपादन व वन विभागाच्या परवानगीमुळे रखडले होते. हा प्रश्‍न मार्गी लागल्यामुळे गव्हाण, जासई, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी व उरण या सहा स्थानकांच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण रेल्वे व सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पासाठी जासई येथील शेतकर्‍यांच्या जमिनी सिडकोने 22 वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकर्‍यांना मिळाला नसल्याने, जासईमधील शेतकर्‍यांनी गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणार्‍या पुलाचे काम बंद केले होते. त्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते.

जासई येथे बंद करण्यात आलेले नेरूळ-उरण मार्गाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू केले आहे. शेतकर्‍यांविषयक विविध प्रश्‍न सोडवण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत.

धनाजी क्षीरसागर,
सहाय्यक पोलिस आयुक्त, पोर्ट विभाग
Exit mobile version