निवृत्त जवान कुमार जाधव यांचे प्रतिपादन
| नेरळ | प्रतिनिधी |
आपल्या देशातील तरुणवर्गाला भारतीय सेनेचे आकर्षण आहे, मात्र त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. भारतीय सेनेत दाखल होण्याची इच्छा असलेल्या तरुणांना आपण फिजिकल ट्रेनिंगसाठी सर्व मदत करायला तयार आहोत, असे आश्वासन नेरळ येथील निवृत्त जवान कुमार गोटीराम जाधव यांनी दिले. नेरळ येथील हुतात्मा चौक येथे मध्यरात्री आयोजित केलेल्या ध्वजारोहण सोहळ्यात कुमार जाधव बोलत होते.
नेरळ येथील हुतात्मा स्मारक समिती यांच्या माध्यमातून भारताचा स्वातंत्र्यदिन 12 वाजून एक मिनिटांनी तिरंगा फडकवून साजरा केला जातो. रात्री अकरा वाजता स्वातंत्र्य दिनानिमित नेरळ गावातून मशाल फेरी काढण्यात आली. याप्रसांगी नेरळ गाव आणि 700 हून अधिक तरुण उपस्थित होते. स्मारक संतीच्या वतीने संतोष पेरणे, दर्वेश पालकर, अजय गायकवाड, ऋषिकेश कांबळे, गणेश पवार, अभिषेक कांबळे, सुमित क्षीरसागर, बंटी शिर्के यांनी उपस्थितोचे स्वागत केले. या कार्यक्रमात कुमार जाधव यांना भारतीय सेनेतील सेवेबद्दल, तर नेरळ परिसरात दहावीत पहिली आलेली स्वराली नितीन थोरात हिचा आणि जागतिक युवा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रोमानियामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असलेल्या अमृता ज्ञानेश्वर भगत हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना शिंदे गट सचिव अंकुश दाभणे, उपतालुका प्रमुख आणि नेरळचे माजी उपसरपंच अंकुश शेळके, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी, माजी सभापती सुजाता मनवे, भाजप तालुका सरचिटणीस राजेश भगत, शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख बंडू क्षीरसागर, तालुका उपसंघटक सुधाकर देसाई, मनसे तालुका उपाध्यक्ष मिलिंद मिसाळ, प्रभाकर देशमुख, किसन शिंदे, नेरळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे, माजी मुख्याध्यापक पी.बी. राठोड, आर्दश शिक्षक रवी काजळे, डॉ. हेमंत शेवाळे यांच्यासह नेरळ गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर मंडळ, श्री साई देवस्थान, जैन सकळ संघ, मुस्लिम युथ फोरम, श्री सिद्धिविनायक मंडळ पाडा, जयदीप मंडळ, नेरळ परिसर ग्रुप, वैष्णव हिंदू परिषद, नेरळ नववर्ष स्वागत यात्रा, डी थ्री ग्रुप, श्री विघनहर्त मंडळ, नेरळचा राजा मंडळ, श्री गुरुदत्त मंडळ, बुऱ्हाणी पार्क तरुण मंडळ आदी सर्व समाजातील तरुण तसेच महिला यांची मोठी उपस्थिती होती.
