। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ विद्या मंदिर आणि प्राथमिक विभाग शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या व वाईट स्पर्शाची माहिती देण्यासाठी ‘निर्भयता तुमचा हक्क’, ‘आत्मरक्षण आवश्यक’ या विषयांवर चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी निवृत्त जवान कुमार जाधव यांनी स्वतःचे रक्षण करण्याची हिम्मत विद्यार्थ्यांनी स्वतःच दाखवावी, असे आवाहन केले.
निवृत्त जवान कुमार जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या शरीरातील महत्वाचे घटक कोणते आहेत याचा आपल्याला अभ्यास पाहिजे. आपल्या शरीराचे हात आणि पाय हे आपले मुख्य अस्त्र आहेत. त्यांचा वापर समोरच्या व्यक्तीने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यावर करावा, असे आवाहन केले. आपल्याला पाठीमागून कोणी पकडून ठेवले तर आपण त्या व्यक्तीची करंगळी पकडावी आणि सरळ मोडावी म्हणजे आपली सुटका होईल. यानंतर त्याने पुन्हा प्रतिकार केला तर सरळ डोळ्यात बोटे घालावीत, अशी सूचना देखील केली.
रोहन शेंडे यांनी सांगितले की, गुड टच हे आपले आई-वडील व घरचे नातेवाईक करीत असतात. पण अनोळखी व्यक्ती हे आपल्या शरीरावर, ओठांवर, पाठीमागील भागावर हात फिरवून वाईट स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत असतात. यावेळी आपण आधी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करावा आणि आपले घर गाठावे. आपण आजारी असताना डॉक्टरकडे जातो त्यावेळी आपले आई-वडील सोबत असतील तेंव्हा वाईट स्पर्श करून दिला तरी चालेल.पण, कोणताही व्यक्ती वाईट स्पर्श करीत असेल तर त्यांची तक्रार करायची, असे आवाहन केले.