चमचमीत खाद्यपदार्थ असलेल्या स्टॉलवर गर्दी; घातक सवयीमुळे मुलांचे आरोग्य धोक्यात
| कापोली | प्रतिनिधी ।
आजची तरुण पिढी, अगदी लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन तरुण-तरुणींपर्यंत, आरोग्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत. घरात आईने प्रेमाने बनवलेले पौष्टिक जेवण नकोसे झाले असून, गल्लोगल्ली असणाऱ्या चायनीज गाड्या आणि उघड्यावरील टपऱ्यांवर तरुणांची गर्दी उसळत आहे. या घातक सवयीमुळे मुलांचे आरोग्य तर धोक्यात आलेच आहे, पण दिवस-रात्र कष्ट करून पैसा कमावणाऱ्या आई-वडिलांची मानसिक आणि आर्थिक कोंडी होत आहे.
आई-वडिलांची मूक व्यथा मुलं जाणून कधी घेणार? त्यांचा सवाल आहे की,आम्ही राबायचं कुणासाठी? दिवसभर उन्हातान्हात कष्ट करून, स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आम्ही मुलांच्या हातात पैसे देतो. त्यांनी चांगले अन्न खावे, शिकावे म्हणून आमची धडपड असते. पण मुले तोच पैसा चायनीज, थंडपेये आणि आईस्क्रीमवर उडवतात. घरात ताजे अन्न शिजवून आम्ही वाट पाहत असतो, पण मुले बाहेरून पोट भरून येतात, अशी हतबलता अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. पालकांच्या खिशाला यामुळे मोठी कात्री लागत आहे. मुले बाहेरचे खाऊन आजारी पडली की, पुन्हा डॉक्टर आणि औषधोपचाराचा आर्थिक भारही याच मध्यमवर्गीय आई-वडिलांना सोसावा लागत आहे.
लहान मुलांपासून तरुणांपर्यंत पोटाचे विकार आणि जीव धोक्यात येऊ लागले आहे. लहानपणापासूनच मुलांना बाहेरील चमचमीत खाण्याची चटक लागल्याने त्याचे अत्यंत घातक परिणाम आता समोर येत आहेत. चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे रासायनिक रंग, ‘अजिनोमोटो’ (टेस्टिंग पावडर) आणि निकृष्ट दर्जाचे तेल यामुळे पोटाचे आणि आतड्यांचे गंभीर विकार उद्भवत आहेत. यकृत आणि पचनसंस्थेचे कायमचे नुकसान होत आहे. उघड्यावरील अन्नामुळे कावीळ, टायफॉइड आणि गॅस्ट्रोसारखे आजार बळावत आहेत. सततच्या थंडपेयांमुळे (कोल्ड्रिंक्स) आणि आईस्क्रीममुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका तरुण वयातच निर्माण होत आहे.
अन्नाचा थेट संबंध मनाशी आणि बुद्धीशी असतो. बाहेरचे अशुद्ध आणि तेलकट अन्न खाल्ल्यामुळे शरीरात आळस वाढतो. आजच्या तरुणांना व्यायामाकडे वळायला हवे, मैदानावर घाम गाळायला हवा, पण सकाळी लवकर उठण्याचा आळस त्यांच्या अंगी खिळला आहे. सततच्या आजारपणामुळे आणि शारीरिक अस्वस्थतेमुळे तरुणांचे अभ्यासावरील आणि करिअरवरील लक्ष विचलित होत आहे. याचा थेट परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यावर होत आहे. कान उघडणारे मार्गदर्शन अनेक शिबिराच्या माध्यमातून किंवा व्याख्यानमालेत केले जाते. ते सतत आवाहन करत असतात. ज्या आई-वडिलांनी लहानाचे मोठे केले, त्यांच्या भावनांचा आणि कष्टाचा आदर करायला शिकलं पाहिजे पण तरुणांकडून तसे होताना दिसत नाही.
आळस सोडायला हवय. व्यायाम करायचे विसरुन गेले आहेत. काही मुलं थोडे दिवस दंड तपासून पहातात आणि पुन्हा जागेवर येऊन मोबाईलमध्ये मग्न असतात. दिवसातून किमान अर्धा तास स्वतःच्या शरीरासाठी काढायला हवा. योगासने, धावणे किंवा व्यायाम करा. पैशाची किंमत जाणायला शिका. आई-वडिलांचा पैसा हा फुकट आलेला नाही, तो तुमच्या चांगल्या भविष्यासाठी आहे, आजारपण विकत घेण्यासाठी नाही. थोडक्यात काय तर क्षणभराच्या जिभेच्या सुखासाठी स्वतःचे आरोग्य आणि आई-वडिलांची स्वप्ने पणाला लावू नका. बाहेरचे खाणे बंद करा आणि एक निरोगी, सुजाण नागरिक बनण्याच्या दिशेने पाऊल टाका! असे अनेक आई-वडीलांचे म्हणणे आहे.
घराच्या अन्नाला मान द्या
घराच्या अन्नाला मान द्यायला हवा पण मुलं आपल्याच अविर्भावात आहेत. आईच्या हाताच्या जेवणात जे पोषण आणि प्रेम आहे, ते जगातील कोणत्याही चायनीज स्टॉलवर मिळू शकत नाही. जिभेचे चोचले थांबवायला हवेत. जीभ फक्त काही सेकंदांची चव पाहते, पण त्याचे परिणाम शरीराला वर्षानुवर्षे भोगावे लागतात.
