2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील बांबूज ग्रूप फार्म हाऊस चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली. या गुन्ह्याता 2 लाख 80 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात मालमत्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील बांबूज ग्रूप नावाच्या फार्महाऊसमध्ये दि.25 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या सात दिवसांच्या कालावधीत रात्री साडेआठ ते सकाळी साडेअकरा या वेळेत चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी घरातील सोफा कम बेडच्या पेटीमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागीन्यांपैकी 2 लाख रुपयांचा सोन्याचा हार, वीस हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि 60 हजार रुपयांचा सोन्याचा झुमका असा एकूण दोन लाख 80 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरट्यांनी गायब केला. ही बाब येथील केअर टेकरच्या लक्षात येण्यापुर्वी चोरट्यांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार म्हात्रे यांच्याकडून सुरु आहे.
