चालत्या गाडीतून चोरी

| रोहा | वार्ताहर |

चालत्या टेम्पोच्या मागील बाजूस असलेल्या ट्रॉलीचा दरवाजाचा तोडून त्यामधील लाखो रुपये किंमतीचे साहित्य लंपास केल्याची घटना रोह्यात उघडकीस आली. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही घटना मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ ते रोहा भिसे खिंड या दरम्यान घडली आहे.

प्रकाश एकनाथ हनुमंते हे गुरुवारी रात्री आपल्या मालकीचा टेम्पो घेऊन वडखळहून रोह्याकडे जात होते. त्यांनी टेम्पोच्या मागे असलेल्या ट्रॉलीमध्ये फ्लिपकार्ड कंपनीचे चप्पल, बूट, कपडे, इलेक्ट्रिक साहित्य, मुलांची खेळणी असा 1 लाख 10 हजार 317 रुपये किंमतीचा माल मोठ्या पिशवीत भरून ठेवला होता. दरम्यान, मध्यरात्री 2 ते 4 च्या सुमारास रस्त्यातच चोरट्याने ट्रॉलीच्या मागील दरवाजाचे लॉक तोडून त्यामधील किमती साहित्य चोरून नेले. चोरट्याने सिनेस्टाईलने नामी शक्कल लढवून चालत्या गाडीतून साहित्य चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. प्रकाश हनुमंते यांच्या तक्रारीनुसार रोहा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्रीधर अधिकारी तपास करीत आहेत.

Exit mobile version