अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग कार्यक्षेत्रातील महावितरण महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी शाखा रामराज अंतर्गत येत असलेल्या मालाडे व तळवली येथून धातूची कॉईल, कोअर व अल्युमिनियम धातूची कंडक्टर केबल आदी साहित्य चोरीप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 24 मे रोजी सकाळी दहा ते दि. 30 मे सकाळी दहाच्या दरम्यान अलिबाग तालुक्यातील कार्यक्षेत्रातील महावितरण महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी शाखा रामराज अंतर्गत येत असलेेल्या मालाडे गावाच्या हद्दीत ग्राहकांच्या शेतीकरिता बसविण्यात आलेल्या 16 के.व्ही.च्या ट्रान्सफार्मर क्र. 20002 मधील अंदाजे 50 कि. ग्रॅम वजनाची 10 हजार रूपये किमतीची अॅल्युमिनियम धातूची कॉईल व कोअर, तळवली गावाच्या हद्दीतील पोलवरील अंदाजे 60 कि. गॅम वजनाची अंदाजे 12 हजार रूपये किमतीची अॅल्युमिनियम धातूची कंडक्टर केबल असा एकूण 22 हजार रूपये किमतीचे विद्युत साहित्य मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेले आहे. याबाबतची तक्रार रेवदंडा पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात आली आहे.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहा. फौजदार दिनेश पिंपळे हे करत आहेत.