। पोलादपूर । प्रतिनिधी ।
नगरपंचायत पोलादपूरच्या वतीने महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी पोलादपूर शहरातील यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल व शंकरराव महाडिक इंग्लिश स्कूल येथील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी तसेच विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय, तृतीय गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तर रमाई आवास योजनेंतर्गत सहा लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 75 हजारांचा धनादेश तर प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत नऊ लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये एक लाखांचा धनादेश नगरपंचायतीच्या माध्यमातून वाटप करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्यासह पोलादपूर नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, अर्थ नियोजन, शिक्षण सभापती अंकिता निकम, सुरेश पवार, सतीश शिंदे, सुशांत जगताप, दीपक शेठ, नगरसेवक नागेश पवार, विनायक दीक्षित, नगरसेविका स्नेहा मेहता, अस्मिता पवार, मृगया शहा, अभियंता निशांत औसरमल, प्रशासकीय अधिकारी रुपेश जाधव आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते. याप्रसंगी चंद्रकांत कळंबे आणि नगराध्यक्षा शिल्पा दरेकर यांनी आपली मनोगते मांडली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.