नातेवाईकांसोबत आठवड्यातून तीन वेळा बोलण्याची संधी
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
वेगवेगळ्या गुन्ह्यांतील कैद्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, ते माणूस म्हणून घडावेत, यासाठी जिल्हा कारागृहात वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कैद्यांना थेट नातेवाईकांसोबत बोलण्यासाठी ‘आनंद फोन’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आठवड्यातील तीन वेळा तीस मिनिटं नातेवाईकांसोबत बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अलिबागमधील जिल्हा कारागृहात खून, चोरी, मारामारी अशा अनेक गुन्ह्यांतील कैदी आहेत. दगडाने तटबंदी असलेल्या या कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता 82 इतकी आहे. त्यामध्ये 80 पुरुष व दोन महिला कैद्यांचा समावेश आहे. मात्र, वाढत्या गुन्हेगारीमुळे कैद्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे जिल्हा कारागृहात सध्या दोनशेहून अधिक कैदी आहेत. त्यात 191 पुरुष व 11 महिला कैद्यांचा समावेश आहे. कैद्यांना शुध्द पाणी मिळावे म्हणून तीस हजार लीटरचे पाणी शुध्दीकरण केंद्र बसविण्यात आले आहे. प्रतिमाणसी 135 लीटर पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतागृह, पाळणाघर, नातेवाईकांसाठी मुलाखत कक्ष, कैद्यांना न्यायालयात हजर राहता आले नाही, तर थेट ई-मुलाखत सेवा कारागृहातून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पाच व्हीडीओ कॉन्फरन्स कक्ष बांधण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी दोन वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. संरक्षक भिंतीला संपूर्ण बारबेड वायर जोडण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही पावले उचलण्यात आली आहेत.
कारागृहातील स्वयंपाक कक्ष अद्ययावत करण्यात आले आहे. भाजीपाल्यासह अन्य पदार्थ ताजे ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा कारागृहाचे कामकाज गतिमान करण्याबरोबरच कैद्यांमध्ये परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न वेगवेगळे उपक्रम राबवून करण्यात आला आहे.
…म्हणून फोनची सुविधा
काही कैद्यांचे नातेवाईक दूर असल्याने त्यांना प्रत्यक्ष भेटता येत नाही. परंतु, कैद्यांना थेट नातेवाईकांसोबत बोलता यावे, कुटुंबाची विचारपूस करता यावी, यासाठी जिल्हा कारागृहात आनंद फोन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कारागृहात एक फोन ठेवण्यात आला आहे. या फोनद्वारे कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा तीस मिनिटं नातेवाईकांना बोलण्याची संधी देण्यात आली आहे. या सुविधेमुळे कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत बोलता येते.
बंद्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीबरोबर शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. आनंद फोन सुविधाद्वारे बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत बोलण्याची संधी आठवड्यातून तीन वेळा देण्यात येत आहे.
– अशोक कारकार, कारागृह अधीक्षक