रायगडात 44 ब्लॅक स्पॉट; वाहने सावकाश चालविण्याचे चालकांना आवाहन
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्याने अपघात होण्याची भीती कायमच असते. वाहन चालविताना अपघात प्रवण क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याने काहींना कायमचे अपंगत्व येते, तर काहींना जीव गमवावा लागतो. जिल्ह्यातील महामार्गाला 44 ब्लॅक स्पॉटचा विळखा आहे. त्यामुळे वाहन चालविताना काळजीपूर्वक चालवा, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. जिल्ह्यात औद्योगिकीकरणदेखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरीकरणदेखील वाढू लागले आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांसह कोकणातील पर्यटनस्थळी येणार्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शनिवार व रविवारी तसेच अन्य सुट्टीच्या दिवशी अलिबागसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळी पर्यटक फिरण्यास येतात. कोकणातही पर्यटक फिरण्यासाठी जातात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. काही वाहन चालक निश्चित स्थळी लवकर पोहोचण्याच्या नादात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती अधिक असते.
मुंबई-गोवा महामार्गासह मुंबई-पुणे द्रुतगती राष्ट्रीय महामार्गावरील काही वळणांच्या ठिकाणी बेदरकारपणे वाहने चालविल्याने अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला असून, काहींना जखमी होऊन कायमचे अपंगत्व आले आहे. जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते.
ज्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे, त्या अगोदरच फलक लावून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन केले जाते. ठिकठिकाणी वाहतुकीचे दहा सुवर्ण नियम फलकाद्वारे लावून वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. रायगड जिल्ह्यामध्ये 44 ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) आहेत. या अपघात प्रवण क्षेत्रातील अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांना वाहन सुरक्षित चालविण्याचे संदेश दिले जात आहेत.
जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटची माहिती चालकांना दिली जात आहे. अपघात होऊ नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावून वाहनांचा वेग कमी करण्याबरोबरच नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात वाहतूक पोलिसांद्वारे कारवाई केली जात आहे. महामार्गावरून प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
– सोमनाथ लांडे, पोलीस निरीक्षक
जिल्हा वाहतूक शाखा, रायगड
ब्लॅक स्पॉट म्हणजे काय?
रस्त्याच्या विशिष्ट भागात वारंवार अपघात होत असल्यास किंवा तीन वर्षांत एकाच ठिकाणी पाच-दहा अपघात झाले, तर ती जागा ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केली जाते. यानंतर या ठिकाणचे तज्ज्ञ पथक अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर सूचना देऊन ही जागा सुरक्षित कशी करता येईल, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करतात.
जिल्ह्यातील प्रमुख मार्ग
रायगड जिल्ह्याचा विचार करता प्रामुख्याने मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हे प्रमुख रस्ते जिल्ह्यातून जातात. याखेरीज खंडाळा घाट, बोरघाट, कशेडी घाट, आंबेनळी घाट हे प्रमुख धोकादायक आणि अपघात प्रवण घाटत आहेत. या ठिकाणी सातत्याने अपघात होत असतात.
यामुळेच अधिक अपघात
जिथे दाट लोकवस्तीचा रस्ता, अशा ठिकाणांहून लोक पुन्हा पुन्हा रस्ता ओलांडतात, रस्त्याच्या बांधकामात होणारे दुर्लक्ष आणि जास्त रहदारीमुळे रस्त्याची झालेली दुरवस्था, त्याचप्रमाणे बराच काळ त्याची काळजी न घेतल्यास हा रस्ता अपघातांचे माहेरघर बनू लागल्याचेही दिसून येते.
वडखळ-अलिबाग
तिनविरा
राज्यमार्ग
कर्जत चारफाटा, दासगाव
मुंबई-गोवा महामार्ग
खारपाडा पूल, खरोशी फाटा, तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा, उचेडे, डोलवी, गडब, कासू, आमटेम, पेण फाटा ते अंगार आळी, सुकेळी खिंड, तळवली, पुई, मुगवली, कशेणे, ढालघर, तिलोरे, रेपोली, लोणेरे, टेमपाले, तळेगाव, गोरेगाव बस स्थानकाच्या 500 मीटरमधील, लोणेरे बसस्थानकाच्या 200 मीटरमध्ये, टेमपाले ते लाखपाले ते पेहेल, गांधारपाले, वीर, वीर फाटा, चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले.
मुंबई-पुणे एन.एच. 04 मार्ग
खोपोली एक्सीट पॉईंट, अंडा पॉईंट खोपोली, कलोते, लोधीवली.
द्रुतगती मार्ग
ढेकू गाव-खोपोली, आढोसी गाव-खोपोली, माडप बोगदा ते लोधीवली, पानशिल, रिसवाडी.