उपचारादरम्यान वृध्दाचा मृत्यू
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
संगमेश्वर तालुक्यातील कोंडओझरे येथील शांताराम गंगाराम नाचरे (75) या वृध्दाने आजारपणाला कंटाळून स्वतःला पेटवून घेतले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा शनिवार, 31 मे रोजी सकाळच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम नाचरे (रा. कोंडओझरे, देवरुख, ता. संगमेश्वर) यांनी शुक्रवार, 30 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीला माझ्या छातीत दुखत आहे, तू बाहेरून रिक्षा घेऊन ये, असे सांगितले. पतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांची पत्नी घराबाहेर गेली असता, शांताराम नाचरे यांनी घरातील रॉकेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. काही वेळातच त्यांची पत्नी रिक्षा घेऊन परतल्यावर त्यांना पती भाजून गंभीर जखमी झालेले दिसून आले. त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना प्रथम देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारांसाठी त्यांना मध्यरात्रीत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच, सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.