केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा
| नागपूर | प्रतिनिधी |
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांनी काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार असल्याचा इशारा दिला आहे. विशेषतः जे कंत्राटदार योग्य आणि गुणवत्तापूर्ण काम करत नाही, त्यांना गडकरींनी सुनावले आहे.
कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार आहे. तांत्रिक आणि आर्थिक पात्रता यापूर्वी कंत्राटदार ठरवायचे. काळा कोट घालून जो यायचा त्यालाच कंत्राट मिळेल, एवढेच ठरवायचे बाकी राहिले होते, असेही त्यांनी म्हटले आहे. पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था, जलदगती निर्णय घेण्याची क्षमता आणि गुणवत्तापूर्ण काम आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नागपूरमधील सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, ब्रह्मपुत्रा नदीत पाण्याखालून 12 हजार कोटी रुपये खर्चून बोगदा बांधण्यात येणार आहे. हा खर्च कमी करण्यासाठी गेले वर्षभर मी प्रयत्न केले. त्यासाठी तांत्रिक, आर्थिक विषयांचा अभ्यास केला.
खराब रस्त्याची बांधणी केल्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवला यावा. या अपघातांसाठी रस्ते बांधणी करणारे कंत्राटदार आणि अभियंत्यांना जबाबदार धरावे आणि त्यांना तुरुंगात पाठवावे, असाही इशारा त्यांनी दिला होता. वाढत्या रस्ते अपघातांच्या समस्येला तोंड द्यावे लागणे ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. देशात दरवर्षी 4 लाख 80 हजार रस्ते अपघात होतात. तर त्यात 1 लाख 80 हजार मृत्यू होतात. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहेत. यापैकी 66.4 टक्के मृत्यू हे 18 ते 45 वयोगटातील आहेत. यामुळे जीडीपीचे 3 टक्के नुकसान झाले आहे. रस्ते अपघातात डॉक्टर, अभियंते आणि महत्त्वाच्या व्यक्ती, प्रतिभावान तरुणांचा मृत्यू होणे हे आपल्या देशासाठी खरोखरच मोठे नुकसान आहे, अशी खंतही गडकरी यांनी याआधी व्यक्त केली होती.