। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रुग्णालय इमारतीच्या बांधकाम दुरुस्तीसाठी आणलेल्या तीन टन लोखंडी सळया चोरीला गेल्या आहेत. धक्कादायक म्हणजे रुग्णालयाच्या आवारातून ही चोरी झाली असून या चोरीबाबत अद्यापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
जिल्हा रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली आहे. इमारतीला रेलिंग बसविण्याच्या कामाला एक वर्षापूर्वी मंजूरी मिळाली असून अद्यापही ते पुर्णत्वाला आलेले नाही. रुग्णालयाच्या आवारात त्यासाठी लागणार्या सळया पडलेल्या आहेत. संबंधित ठेकेदार याने सार्वजनिक बांधकाम कार्यालय आणि रुग्णालय यामध्ये असलेल्या मार्गावर लोखंडी सळया उतरवून ठेवल्या होत्या.
७ जानेवारीला कर्मचारी यांनी कामे आटपून सळया ठेवलेल्या बाजूला पत्रा लावून आडोसा केला होता. मात्र मध्यरात्री चोरटयांनी तेथील अंधाराचा फायदा घेत त्या लंपास केल्या. सोमवारी सकाळी कर्मचारी कामाच्या ठिकाणी आले असताना हा प्रकार उघडीस आला.
जवळपास तीन टन सळया चोरल्या असून त्यांची किमंत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. सुपरवायझरने हा प्रकार ठेकेदाराला कळविल्यानंतर त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात जावून त्याबाबत माहिती दिली. दरम्यान, दिवसरात्र या आवारात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची रेलचेल असते असे असतानाही चोरट्यांनी ही चोरी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.