पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे आणि भाकरवडमध्ये घरफोडी, चोरी झाली आहे. शनिवार व रविवारी या दोन दिवसात घटना घडल्या असून, यामध्ये 1 लाख 58 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबळे येथील बंद घराच्या आवारात रविवारी (दि. 19) सायंकाळी तक्रारदार फुले तोडण्याचे काम करीत होत्या. त्यांच्या डोळे व तोंडावर कापड बांधून त्यांना ओढत घराच्या मागे चोरटा घेऊन गेला. त्या ठिकाणी त्यांना खाली पाडल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सात ग्राम वजनाचा 90 हजार रुपये किंमतीचा सोन्याच्या लक्ष्मीहाराचा तुकडा घेऊन लंपास झाला. जबरी चोरी प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सरके अधिक तपास करीत आहेत. तसेच भाकरवड येथील नरेंद्र पाटील यांच्या चाळीमधील घरामध्ये शनिवारी (दि.18) सकाळी घरात खिडकीवाटे चोरटा घुसला. त्याने मोबाईलसह रोख रक्कम असा एकूण 68 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार सुरेश वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
