। रायगड । प्रतिनिधी ।
महिलांना एसटीच्या तिकीटदरात 50 टक्के सवलत असल्याने लालपरीतून दररोज सरासरी 20 लाख महिला राज्यभर प्रवास करतात. महामंडळाला दरमहा सरासरी 550 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. पण प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकांवर पुरेशा उपाययोजना दिसत नाहीत. राज्यातील 251 आगार व 31 विभागांमधील प्रवाशांची सुरक्षा अवघ्या दोन हजार 700 सुरक्षारक्षकांवर असून, त्यात एकही महिला सुरक्षारक्षक नाही, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे.
स्वारगेट येथील अत्याचाराच्या प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व विभाग, आगारांमधील स्क्रॅप तथा भंगारातील गाड्यांची माहिती संकलित करण्याचा आदेश दिला आहे. सुमारे एक हजार गाड्यांची विल्हेवाट 15 एप्रिलपूर्वी लावली जाणार आहे.त्यातून महामंडळाला कोट्यवधी रुपये मिळू शकतात. त्या जागांचा वापर प्रवाशांच्या सोयीसाठी व सुरक्षेसाठी करण्याचे नियोजन आहे. तसेच त्याठिकाणी अंधारात होणारे गैरप्रकारही थांबतील हाही हेतू आहे.
आठ महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना एसटी बसमधील प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बसमधून प्रवास करणार्या लाडक्या बहिणींची गर्दी वाढली.सध्या दररोज 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतात. त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक तीन हजार कोटी रुपये मिळणार आहेत. तरीपण, त्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकाही आगारात, स्थानकात महिला सुरक्षारक्षक नाही हे विशेष.
जीपीएस सुविधा असती तर…
प्रवाशांना एसटी स्थानकावर येण्यापूर्वी ते ज्याठिकाणी प्रवासासाठी जाणार आहेत, त्या गाडीची वेळ घरबसल्या समजायला हवी. त्यादृष्टीने सर्व गाड्यांना जीपीएस बसवून प्रत्येक बसगाडीचे लोकेशन, वेळ प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर पाहता यायला हवे. जेणेकरून त्यांच्या वेळेचीही बचत होईल आणि विनाकारण स्थानकावर ताटकळत थांबावे देखील लागणार नाही. परिवहन महामंडळाच्या सर्वच गाड्यांना विशेषत: लांबपल्ल्यांच्या गाड्यांना जीपीएस सुविधा उपलब्ध असती तर स्वारगेट स्थानकावरील अत्याचारातील पीडित तरुणी काही मिनिटे अगोदर स्थानकावर आलीच नसती, असाही सूर उमटत आहे.
राज्य परिवहन महामंडळाचा पसारा
251 - एकूण आगार
31 - एकूण विभाग
14,000 - बसगाड्यांची संख्या
20 लाख - दररोजच्या महिला प्रवासी
2,690 - एकूण सुरक्षारक्षक
000 - महिला सुरक्षारक्षक
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्या प्रत्येक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकांवर पुरेसा उजेड, सीसीटीव्ही उपलब्ध करून दिले जातील. बसगाड्यांना जीपीएस बसविण्यात येईल. प्रत्येक स्थानकांवर महिला प्रवाशांच्या मदतीसाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षारक्षक नेमले जातील. त्याची निविदा लवकरच काढली जाईल.
प्रताप सरनाईक,
परिवहन मंत्री