| पालघर | प्रतिनिधी |
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील झाई गावातील चार खलाशी आणि गुजरात राज्यातील एक खलाशी यांचा बोट बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.4) रोजी घडली आहे. मृतांमध्ये झाई गावातील अक्षय प्रभू वाघात, अमित अशोक सुरूम, सुरज विलास वळवी, सूर्या अशोक शिंगडा आणि गुजरातमधील दिलीप बाबू सोळंकी (रा. वनगबार, गुजरात) यांचा समावेश आहे.
हे सर्व खलाशी गुजरातमधील बोट मालक चुनीलाल देवा बारिया यांच्या निराली या मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कामाला गेले होते. ही बोट 18 फेब्रुवारी रोजी मासेमारीसाठी समुद्रात निघाली होती. मासेमारी करून परतत असताना 4 मार्च रोजी बोटीला अपघात झाला. या अपघातात पाच खलाशी बुडून मृत्युमुखी पडले. या घटनेची माहिती घोलवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साहेबराव कचरे यांनी दिली आहे. या दुर्घटनेमुळे झाई गावात शोककळा पसरली आहे.