| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-माथेरान मिनीट्रेन ही कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याने पुढे जाते. याच मार्गावर नेरळ पेट्रोल पंपाजवळ असलेल्या फाटकावरील डांबरीकरण निखळले आहे. त्यामुळे नेरळ-कर्जत राज्यमार्गावर खड्ड्यांची रांगोळी दिसून येत आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ पेट्रोल पंप येथून नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्ता बनल्यानंतर फाटक निर्माण झाले. या रेल्वे मार्गावरून मिनी ट्रेनच्या अगदी तुरळक फेऱ्या होत असतात. मात्र, त्या फाटकातील खड्डे हे वाहनचालकांसाठी दरवर्षी डोकेदुखी ठरत असते. दरवर्षी रेल्वेकडून या राज्यमार्गावरील फाटकात डांबरीकरण केले जाते. मात्र, त्या ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे डांबरीकरण करण्यात आल्याने पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात खड्डे निर्माण होतात. त्या खड्ड्यांत वाहने अडकत असून, हळूहळू त्या खड्यांचा आकारही वाढतो. त्यावेळी रेल्वे प्रशासनाकडू ते खड्डे बुंजवले जातात. मात्र, पावसाची सर आली की पुन्हा तीच अवस्था निर्माण होते. तसेच, फाटकातील रस्ता अत्यंत अरुंद असल्याने जेमतेम दोन वाहने तेथून ये-जा करतात. परंतु, तेथील खड्ड्यांमुळे दोन्ही बाजूच्या वाहनांचा वेग मंदावतो आणि प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ नवीन डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी मानवाधिकार संस्थेचे कार्यकर्ते गोरख शेप यांनी केली आहे.
मिनीट्रेनच्या फाटकात खड्ड्यांची रांगोळी
