अध्यात्म समजून घेण्यासाठी वयाचे बंधन नसते : प्रल्हाद पै

| नेरळ | प्रतिनिधी |

अध्यात्म हा तरुणपणात नाही तर उतारवयात करायची गोष्ट आहे. हा विचार पूर्णपणे चुकीचा असून, अध्यात्मासाठी वेळ किंवा वय यांचे बंधन नसते. सुखी जीवनासाठी अध्यात्माची जोड देणे आवश्यक असून, ‘प्रॅक्टिकल स्पिरिच्युअल’ यावर संवाद साधण्यात आला. अध्यात्म म्हणजे काय? ते कोणत्या वयात करावं? दररोजच्या डेली रुटीनमध्ये अध्यात्म शक्य आहे का? या ना अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे प्रल्हाद पै यांनी दिली.

कर्जत तालुक्यातील जीवनविद्या ज्ञानपीठमध्ये आयोजित आनंद मेळाव्यात सद्गुरू प्रल्हाद वामनराव पै बोलत होते. जीवनविद्या मिशनतर्फे आयोजित ‘आनंद मेळावा’च्या सहाव्या दिवशीच्या दुसर्‍या सत्रात तृप्ती पराडकर आणि अस्मिता दाभाडे या दोघींनी प्रल्हाद पै यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी अनेकदा अध्यात्म म्हणजे काय? याबाबत लोकांमध्ये संभ्रम पाहायला मिळतो. यावेळी प्रल्हाद पै यांनी अध्यात्माची सोपी व्याख्या उलगडून सांगितली. प्रत्येकक्षण सावधपणे जगून आनंदाच वाटप करणं म्हणजे अध्यात्म, तसेच प्रत्येक क्षणाक्षणाला आनंदाचे वाटप करत राहणे म्हणजे अध्यात्म. सावध तो सुखी, हा सद्गुरु श्री वामनराव पै यांनी दिलेला अमृततुषार यावेळी विचारात घेण्यात आला. अध्यात्माने लाईफस्टाईल चेंज होत नाही, तर अध्यात्माने संपूर्ण जीवनच बदलून जातं. जीवनात सकारात्मक फरक पडतो. जीवनात बॅलेन्स लाईफ हवं असेल तर जीवन विद्येशिवाय पर्याय नाही, असंदेखील यावेळी प्रल्हाद पै यांनी सांगितले.

आनंद मेळावाच्या सहाव्या दिवशीच्या पहिल्या पर्वात ज्येष्ठ प्रबोधक गणपत पाष्टे गुरुजी, ज्येष्ठ प्रबोधक अशोक नाईक आणि संध्या श्रीकांत नाईक-श्रीकांत पांडुरंग नाईक यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. जीवनविद्या मिशनचे कार्य आयुष्यभर निःस्वार्थपणे करणार्‍या काही कार्यकर्त्यांना या कार्यक्रमात जीवनगौरव या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरु वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जतमधील जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये दि. 24 ते 29 नोव्हेंबरदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version