मुरूड ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नाही

दहा जागा रिक्त

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

30 खाटांची क्षमता असणाऱ्या मुरुड ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाकडून 28 पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात 18 पदे भरलेली असून, 10 पदे रिक्त असल्याने मोठा ताण उपलब्ध कर्मचाऱ्यांवर येत आहे. वैद्यकीय अधिकारी वर्ग-2 चे तीन डॉक्टर्स जागा हंगामी तत्त्वावर भरलेले आहेत. कायमस्वरूपी स्त्री रोग वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाही. कक्ष सेवक 4 जागा, शिपाई 1 जागा रिक्त आहे.

येथे निर्मला भोसले नावाच्या एकच कायम अधिपरिचरिका कार्यरत असून, त्यांचीदेखील बदली काही महिन्यांपासून पनवेल येथे झालेली आहे; मात्र दुसरी कायमस्वरूपी अथवा प्रतिनियुक्तीवरदेखील अधिपरिचरिका नसल्याने निर्मला भोसले यांना कार्यभार मुक्त केले जात नसल्याचे समजते. काही वर्षांपासून या रुग्णालयात हंगामी तत्त्वावर मेडिकल अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असून, येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नियुक्त झाल्यास रुग्णांना अधिक उत्तमपणे आरोग्य सेवा देणे सुकर होईल, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून आणि रुग्णालयात अनेक रुग्णांकडून ऐकायला मिळत आहेत. मुख्य म्हणजे, असे असूनही या रुग्णालयात गर्दी वाढती असून, दररोज 80 ते 100 ओपीडी रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. नवीन रुग्णालये निर्माण करण्यापेक्षा प्रथम आहेत ती रुग्णालये कर्मचारी जागा भरून सुसज्ज केल्यास प्रभावी आरोग्य सेवा देता येईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version