| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा केवळ एका लढ्याचा विजय आहे; पण ही लढाई इथे संपलेली नाही. सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या सरकारने लोकशाहीची गळचेपी करण्याचे काम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला.
त्या म्हणाल्या, गेल्या काही दिवसांत देशाने लोकशाहीचा संघर्षही पाहिला आणि सत्तेचा अहंकारही पाहिला. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मिळाला तो विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे, संघर्षामुळे आणि सर्व विरोधी पक्षांच्या एकत्रित लढ्यामुळे. त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा, लाल बावट्याचा आणि लोकशाही वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक पक्षाचा मला अभिमान आहे.
सरकारवर घणाघाती टीका करत त्या म्हणाल्या, एका राजीनाम्याने काहीच संपत नाही. आंदोलनादरम्यान अल्पवयीन मुला-मुलींवर झालेला लाठीमार, त्यांच्यावर झालेले अमानुष अत्याचार आणि त्यानंतर केवळ माफी मागून विषय संपविण्याचा प्रयत्न हा संतापजनक आहे. एका 16 वर्षांच्या मुलाची आई म्हणून मी विचारते, आंदोलनाला गेलेल्या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची होती?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत त्यांनी प्रश्न उपस्थित केला, आंदोलन करणारे विद्यार्थी गृहमंत्री होते का? राहुल गांधी गृहमंत्री होते का? की आमच्यासारखे कार्यकर्ते गृहमंत्री होते? कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची असताना विद्यार्थ्यांवर लाठ्या का बरसल्या? शांततापूर्ण आंदोलनाचे रूपांतर हिंसाचारात होऊच कसे दिले?
सोशल मीडियावर आंदोलकांविरोधात करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य करत त्या म्हणाल्या, आंदोलक दगड घेऊन आले होते, ते समाजकंटक होते, असे कथित दावे करण्यात आले. मात्र, आधी स्वतःच्या पक्षातील आणि मित्रपक्षातील नेत्यांची बेताल वक्तव्ये थांबवा. स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱ्यांवर दगड मारण्याचा नैतिक अधिकार कुणालाही नाही.
पुढे त्या म्हणाल्या, आज देशातील पुरोगामी पक्ष गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आंदोलनातील लाठीमार, विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि मृत्यूंसाठी जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. आता अति झाले आहे.
ईव्हीएमच्या मुद्द्यावरही त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आवाहन केले. ईव्हीएमबाबत जनजागृतीची मोठी मोहीम उभी करावी लागेल. गल्ली, बूथ आणि गावागावात जाऊन लोकांना जागे करावे लागेल. काही रुपयांसाठी मत विकू नका, कारण त्याची किंमत पुढची पाच वर्षे मोजावी लागते. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविरोधात जनतेत राग आहे. मात्र, तो केवळ मतांमध्ये रूपांतरित करण्यासाठी घराघरात जाऊन संवाद साधावा लागेल. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याला संघटितपणे उत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.
संघर्षाशिवाय पर्याय नाही- चित्रलेखा पाटील
