स्थानिक जनतेचा सत्ताधारी नेत्यांना सवाल
| उरण | वार्ताहर |
विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधी महायुतीकडून मुंबईतील पाच ठिकाणी टोलमाफी केल्याचे जाहीर केले. परंतु, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणार्या अटल सेतुवरील टोलमाफी केली नाही. या सेतुवरील टोलमाफी का केली नाही, असा संतप्त सवाल महायुतीतील स्थानिक नेत्यांना जनता करीत आहे.
मुंबईत प्रवेश करताना असणार्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांचा टोल राज्य शासनाने माफ केला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईमध्ये प्रवेश करताना लागणारे टोलनाके वाशी, दहिसर, ऐरोली, मुलुंड आनंदनगर या ठिकाणी हलक्या वाहनांना टोलमधून वगळले आहे. त्यामुळे रोज हजारो गाडी चालकांना त्याचा फायदा होणार आहे, तर कोट्यवधी रुपयांचा फटका राज्य शासनाला बसणार आहे.
मुंबईतील पाच ठिकाणचे टोल माफ केले जात असताना मुंबईच्या हाकेवर असणार्या अटल सेतुवरील टोलमाफीचा निर्णय महायुती सरकारने का घेतला नाही, असा दुजाभाव का केला जात आहे. याबाबत महायुतील येथील स्थानिक नेतेमंडळी गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांना आमची मतं हवी; परंतु आम्हाला सुविधा देण्यास अडचण दिसत असल्याने स्थानिक जनतेत महायुतीबाबत नाराजीचा सूर निघत आहे.