पिंगळस गावातील विहिरीत पाणीच नाही; नवीन नळपाणी योजनेचे तीनतेरा

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतमधील पिंगळस गावातील नळपाणी योजनेची विहीर 30 फूट खोल खोदून देखील कोरडीच राहिली आहे. त्यामुळे त्या विहिरीवर केल्या जाणार्‍या नळपाणी योजनेचे तीनतेरा वाजले असून ग्रामस्थांनी ठेकेदार कंपनीला कोरड्या विहिरीच्या कामाबद्दल बिल अदा करू नये अशी मागणीचे निवेदन पिंगळस ग्रामस्थांनी दिले आहे. दरम्यान, त्या नवीन खोदलेल्या विहिरीत केवळ अर्धा फूट पाणी साचले असल्याने ठेकेदाराने केलेल्या मनमानीमुळे ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.


आ.थोरवे यांनी जिल्हा नियोजन मंडळ मधून 22 लाखाचा निधी पिंगळस नळपाणी योजनेसाठी मंजूर केला. त्यात विहीर खोदणे आणि नंतर विहिरीतील पाणी गावात आणून घरोघरी पोहचवणे असे काम मंजूर झाले. त्या निधीमधून मोठी पाच मीटर व्यासाची विहीर मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला 2022 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. स्थानिक ग्रामस्थांनी कोणत्या भागात पाणी आहे आणि कुठे विहीर खोदली पाहिजे याबाबत विहिरीचे काम मिळविणार्‍या ठेकेदार याला कल्पना दिली होती. मात्र ठेकेदाराने ग्रामस्थांचा म्हणाण्याकडे दुर्लक्ष केले आणि गावापासून 900 मीटर अंतरावर फणसवाडी येथे नाल्याच्या बाजूला विहिरीचे काम सुरू केले. आता जून महिन्याचे पहिल्या आठवड्यात विहिरीचे काम पूर्ण झाले असून त्या विहिरीत अर्धा फूट देखील पाणी नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून ग्रामस्थांनी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाकडे तक्रारी करून ठेकेदाराला विहिरी खोदलेल्या कामाचे बिल अदा करू नये अशी मागणी केली आहे.

पिंगळस ग्रामस्थांची नळपाणी योजना त्या विहिरीवर अवलंबून होती आणि त्या विहिरीत पाणी साचले नसल्याने गावापर्यंत पाणी कसे पोहचणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्या विहिरीमध्ये साचलेले पाणी गावात आणले जाणार होते त्या विहिरीत पाणी नसल्याने गावात कुठून पाणी पोहचणार? असा प्रश्‍न ग्रामस्थांना भेडसावत आहे. गावात पाणी न पोहचताच ठेकेदार आपले पैसे काढून घेणार आणि त्यानंतर नळाला पाणी न आल्याने ग्रामस्थांची पूर्वी होते तशीच धावपळ सुरू होणार अशी त्या विहिरीतील पाणी पाहिल्यानंतर दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी आपण स्वतः फणस वाडी येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली होती.त्यावेळी पाणी बर्‍यापैकी होते.मात्र मे अखेरीस सर्वच विहिरी तळ गाठत असतात ही बाब लक्षात घेता ग्रामस्थांच्या तक्रारी पुन्हा प्रत्यक्ष जावून पाहू.

सुरेश इंगळे, उपअभियंता जिल्हा परिषद लघुाटबंधारे विभाग
Exit mobile version