। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीसाठी भारत निर्माण योजनेतून नळपाणी योजना राबविण्यात आली होती. भूतीवली गावासाठी असलेल्या नळपाणी योजनेतून सध्या आसल आणि भूतीवली या दोन गावांबरोबर तसेच या ग्रामपंचायतीमधील अन्य सहा आदिवासी वाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. या नळपणी योजनेच्या पाणी साठवण विहिरीला छिद्र पाडण्यात आली असून नाल्यात वाहणारे दूषित पाणी हे त्या विहिरीत जात आहे. त्यानंतर त्या विहिरीतील साठून राहिलेले पाणी सहा आदिवासी वाड्या आणि दोन गावांना पाठवले जात असल्याने दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी सरपंच यशवंत कोंडे यांनी केली आहे.
हि योजना ज्यांच्या कार्यकाळात आली त्यावेळचे सरपंच यशवंत कोंडे हे पाली भूतीवली धरणाच्या खाली असलेली विहिर पाहण्यासाठी गेले असता त्यांना धक्का बसला आहे. विहिरीचा स्लॅब फोडून नाल्याचे पाणी विहिरीत जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे. त्यामुळे माजी सरपंच कोंडे यांनी आसल ग्रामपंचायतीचे प्रशासक सुशांत गोरे आणि ग्रामपंचायत अधिकारी संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता या दोन्ही अधिकार्यांनी त्यांचे फोन घेतले नाहीत. त्यामुळे कोंडे यांनी गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना संपर्क करून सर्व माहिती दिली आहे.