। मुंबई । प्रतिनिधी।
यंदा पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान समुद्राला २२ वेळा भरती येणार असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली होती. पावसाने उसंत घेतली असली तरी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जूनमध्ये सहा भरतीचे दिवस असून त्यातील सर्वाधिक मोठी भरती आज येणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासन सतर्क झाले असून समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत गुरुवारी दुपारी १.३५ वाजेच्या सुमारास भरती येणार असून या वेळी ४.८७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. ही सर्वात मोठी भरती ठरणार आहे. अरबी समुद्रात येणाऱ्या या मोठया भरतीमुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे.
भरतीच्या वेळेत जर ५० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला तर मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन दल व पर्जन्य जलवाहिनी विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या काळात समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन देखील पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.