ग्रामपंचायत कोटयवधींची, पण पाण्याचा खडखडाट
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भरपूर निधी आहे, तुम्ही फक्त कामं सांगा, असे सांगून ग्रामस्थांची दिशाभूल करणार्या बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांना स्वतःच्या गावातील पाणी प्रश्न सोडविणे जमले नाही. त्यामुळे गेली कित्येक महिने हजारो अर्ज, तक्रारी देऊनही पाण्यासारखा गंभीर प्रश्न न सोडविणार्या निष्क्रिय बंडखोर आमदाराविरोधात थळ प्रभाग क्रमांक 4 मधील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेली अडीच वर्षे पाण्यासाठी वणवण करणार्या महिलांनी अखेर सोमवारी (दि.10) कृषीवलसमोर आपली व्यथा मांडली.
यावेळी लक्ष्मी रामदास चंदू, जोमाय टिल्लू, विठाबाई ढोले, लता भाटे, वंदना कोळी, प्रमिला साखरकर, प्रमिला हालेकाना, सुचिता दिवाणे, राधा खोत, सुकन्या साखरकर आदी महिला यावेळी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे शेकापचे कार्यकर्ते शिरीष राजके यांच्यासह रामदास चंदू, कैलास टिल्लू, समाधान चंदू, शंतनू राजके, कृष्णा दिवाणे, गोरखनाथ दिवाणे, प्रमोद बामपाटील, सुशिल दिवाणे, रुबीन साखरकर, शंकर चंदू आदी उपस्थित होते.
थळ ग्रामपंचायतीच्या गलथान आणि मनमानी काराभाराचा फटका प्रामाणिकपणे कर भरणार्या नागरिकांना बसत आहे. उन्हाळा तीव्र झाला आहे. मात्र, नळाला नाही पाणी, घागर उताणी रे…अशी आळवणी नागरिकांना करावी लागत असल्याचे चित्र थळमधील काही भागात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना करही भरावा लागतो. मात्र, पाणी वितरणात कमालीची अनियमितता दिसून येत आहे. जवळपास गेले सलग नऊ दिवस या भागात पाणी पुरवठा होत नाही. अशी परिस्थतीत महिन्यातून दोनवेळा देखील उद्भवते. तक्रार केल्यानंतर दोन दिवस व्यवस्थित पाणी येते व नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती असते. तक्रारीचा काहीच लाभ होत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
थळ ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाते. या ग्रामपंचायतीला सुमारे पाच कोटीचे उत्पन्न मिळते. ग्रामपंचायत हद्दीतील गावे, वाड्यांमधील नागरिकांना एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा करण्यात आला आहे. परंतू थळ बाजार येथील कोळीवाड्यापर्यंत पाणी पोहचत नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून पाण्यासाठी येथील महिलांना रात्र-रात्र जागून वणवण करावी लागत आहे. घरापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत पायपीट करावी लागत आहे.
पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत अनेक वेळा स्थानिक आमदारांसह सरपंच यांच्याकडे वारंवार कोळीवाड्यातील ग्रामस्थ, महिलांकडून मागणी करण्यात आली. त्यावेळी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन फक्त दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र पाणी मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यदिनी बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी ग्रामस्थांना पाणी देण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले. मात्र नेहमीप्रमाणे तेही खोटे निघाले. वारंवार खोटे बोलणार्या आमदारांनी ग्रामस्थांना पाणी देण्याऐवजी फक्त आणि फक्त तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले आहे. त्यामुळे आमदारांविरोधात ग्रामस्थांमध्ये वाढती नाराजी व्यक्त होत आहे.
वय झालंय, डोक्यावर हंडा घ्यायला जमत नाही…
घरात एकट्या राहणार्या, साठी उलटून गेलेल्या महिलांना डोक्यावर हंडा घ्यावा लागत आहे. पायपीट करताना रस्त्यात बसत-बसत घर गाठावे लागत आहे. वयोवृद्ध महिलांची केविलवाणी परिस्थिती पाहून उपस्थितांचे डोळेही पाणवले होते.
वाडया शिंपण्यासाठी, बैल धुण्यासाठी पाण्याची उधळपट्टी
गावात कुठल्याही निवडणूका आल्या की नळांना उच्च दाबाने पाणी येते. मात्र निवडणूका संपताच पुन्हा पाणी बंद होत असल्याची कैफियत महिलांनी मांडली. आमचा भाग सोडून इतर भागात वाडया शिंपण्यासाठी नळाचे पाणी 24 तास असते. जनावरे, गाड्या धुण्यासाठी देखील वारेमाप पाणी मिळते फक्त आम्हाला साधे पिण्याचे पाणी देखील देता येत नसल्यानेमहिलांनी संताप व्यक्त केला.
स्वखर्चाने टँकरने पाणी पुरवठा
नळाला पाणी येत नसल्याने या भागातील ग्रामस्थांकडून टँकर्सची मागणी वाढली आहे. दर दोन दिवस आड तब्बल 600 रुपये खर्च करुन पाणी विकत घ्यावे लागते. एकवेळ आमच्याकडून पाणी पट्टी घ्या, ती देखील आम्ही भरायला तयार आहोत. पण आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या, असा आक्रोश कोळी समाजाच्या महिलांनी केला आहे. पाणी देणार नसाल तर लावलेले रिकामे पाईप तरी कशाला हवेत? ते पण काढुन न्या, असा संताप देखील या महिलांनी व्यक्त केला.
थळ ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न अंदाचे 5 कोटी रुपये आहे. मात्र, तरीही थळ प्रभाग क्रमांक 4 मधील पाणी प्रश्न सोडविण्यास आमदार, सरपंच, उपसरपंच असमर्थ ठरत आहे. खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करीत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र सरकार जलजीवन मिशन कार्यक्रम राबवित आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात विशेष ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही पाणी प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पाण्यावरुन गावात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास ग्रामस्थ जबाबदार राहणार नाही.
शिरिष राजके, माजी ग्रामपंचायत सदस्य, थळ