पावसामुळे माशाची यंदा लवकर चव
मळ्याचे मासे 200 रुपये किलो
माणगाव | सलीम शेख |
पावसाळा आला की खेडेगावात वेध लागतात ते वलगनीच्या माशांचे. सुरुवातीच्या पावसात नदी-नाल्यातून येणारे मासे खाण्यासाठी अतिशय चविष्ट व गाभोळीयुक्त असतात. दर्दी खवय्ये या माशांच्या खरेदीसाठी गर्दी करीत असतात.
खास सुरुवातीच्या पावसात मिळणारे हे वलगनीचे मासे खाण्यास अतिशय चविष्ट असतात.अनेक जण पाग, कंडाळ घेऊन भरपावसात वलगनीचे मासे मारण्यासाठी दिवसरात्र एक करतात. या माशांमध्ये मळ्याचे मासे, शिवरे, शिंगट्या प्रसिद्ध आहेत. खोल पाण्यात मासेमारी करण्यापेक्षा अनेक मासेमार या दिवसातील वलगनीचे मासे पकडण्यास प्राधान्य देतात. खास पाण्याच्या विरुद्ध प्रवाहाबरोबर पोहत जाऊन मासे सुरुवातीच्या पावसात प्रवास करतात. पाग तयार आहेत. मासे पकडण्यासाठी गरगे घालून तयार आहेत.
यावर्षी 7 जूनपासूनच संततधार पाऊस सुरू झाल्याने ओढे, नाले शेतातून पाणी साचू लागले आहे. त्यामुळे वलगनीच्या माशांची चव लवकरच चाखायला मिळणार असल्याने खवय्ये आनंदित झाले आहेत. गेल्या वर्षी पावसाच्या अनियमित पणामुळे वलगनीच्या माशांची खवय्यांना प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र, यावर्षी सुरुवातीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने खवय्ये आनंदित झाले आहेत. दरम्यान, विक्रीसाठी वलगनीचे गाभोळीयुक्त मासे येत असून, मळ्याचे मासे 200 रुपये, शिवड्याचे मासे 400 रुपये किलो दराने विक्री होत आहेत.
वलगन म्हणजे काय?
पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मासे शेताडीतून, ओहोळामधून अंडी सोडण्यासाठी मुख्य डोहापासून स्थलांतर करतात. माशांच्या या प्रवासास ‘वलगन लागली’ असे म्हणतात. पावसात पाण्यात अंडी सोडून झाल्यानंतर मासे परतीच्या प्रवासास सुरुवात करतात, यास ‘वलगन उतरणे’ असे म्हणतात.
सुरुवातीच्या पावसात मिळणारे मासे अतिशय चविष्ट असतात. अगदी छोट्या ओहोळामधून हे मासे पकडण्यास मिळतात. आम्ही पाग घेऊन दरवर्षी मासेमारी करतो. यावर्षी सुरुवातीपासूनच संततधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे वलगन लवकर लागत आहे. काही ठिकाणी डोहातून, नाल्यातून वलगनीचे मासे मिळत असून, 200 रुपये किलोने मळ्याचे मासे मिळत आहेत.
शैलेश वडेकर, खवय्ये, माणगाव