संप काळात खंडित वीजपुरवठा होणार

। भांडूप । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या 26 व महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतील 12 संघटनांनी वीज कंपन्यांच्या खासगीकरणा विरोधात व विविध मागण्यांसाठी संप सुरु केला आहे. जरी या संपात मोठ्या संख्येने वीज कंपन्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असतील, तरी अखंडित वीजपुरवठा करण्याची पूर्वतयारी महावितरणच्या भांडुप परीमंडलाने केली आहे.
याबाबत, भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी तिन्ही मंडळातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर अधिकार्‍यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत मनुष्यबळ तसेच इतर आवश्यक साहित्याचे नियोजन करून संप काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
दोन दिवस होणार्‍या संपात प्रत्येक उपविभागात आवश्यक मनुष्यबळ उदा. अधिकारी,कर्मचारी, लाईन स्टाफ व बाह्यस्त्रोत कर्मचार्‍यांची उपलब्धता तसेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक साहित्याचा आढावा घेऊन पूर्ण नियोजन केले आहे. याशिवाय, प्रत्येक मंडळात असलेल्या एजन्सीशी संपर्क साधून अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्थाही केली आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वितरण रोहित्र, विद्युत तारा तसेच प्रत्येक उपविभागात गाड्यांची व्यवस्था केली आहे. भांडूप परिमंडळात तसेच तिन्ही मंडळात नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. परिमंडलाच्या नियंत्रण कक्षातून स्वतः मुख्य अभियंता श्री सुरेश गणेशकर सर्व परिस्थितींवर लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे, ग्राहकांवर या संपाचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून सर्व तयारी मुख्य अभियंता श्री सुरेश गणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तसेच, तिन्ही मंडळाचे डी एस एस कंट्रोल रूम (ठाणे – 9930269398, वाशी -8879935501, पेण-7875765510) चालू असणार असून ग्राहकांनी वीजेबाबत काही तक्रारी असल्यास संपर्क साधावा. तरीही, एखाद्या ठिकाणी जर काही कारणास्तव कुणाचाही वीजपुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत करण्यासाठी जर वेळ लागला तर ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सर्व वीज ग्राहकांना केले आहे.

Exit mobile version