| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील महावितरणाचे सहा अभियंते व उप मुख्यकार्यकारी अभियंता हे संपात सहभागी झाले आहेत. तर नांदगाव येथील अभियंता सनील करंदेकर व मजगाव येथील अभियंता प्रियांका सूर्यवंशी हे कामावर हजर राहिले आहेत.त्याच प्रमाणे मुरुड तालुक्यातील महावितरणचे सर्व तांत्रिक कर्मचारी हे कामावर हजर राहिल्याने ग्राहक सेवेवर याचा कोणताही परिणाम जाणवला नाही.
रायगड जिल्ह्यातील 50 टक्के अधिकारी, कर्मचारी, अभियंता हे आजच्या लाक्षणिक संपात सहभागी झाले होते. विद्युत कायदा 2003 मध्ये दुरुस्ती करून सर्व शासकीय कंपन्या यांचे खाजगीकरण करण्यात येणार आहे. याच्या निषेधार्त रायगड जिल्ह्यातील महावितरण कर्मचारी दिनांक 28 व 29 मार्च रोजी संपात सहभागी झाले होते. परंतु त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
अभियंता, अधिकारी, या संपात सहभागी असले तरी तांत्रिक कर्मचारी आणि मागासवर्गीय संघटना कर्मचारी यांनी या संपातून माघार घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळणार आहे. सध्या मुरुड तालुकायचा वीज पुरवठा सुरळीत असून यामध्ये आज कोणताही बाधा आलेली नाही.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे भांडुप झोनचे उपाध्यक्ष विजय राठोड यांनी सांगितले की, ऊर्जा मंत्री माननीय डॉक्टर नितीन राऊत यांनी आमच्या संघटनेशी चर्चा केली असून त्यांनी आम्हाला सांगितले आहे कि, महावितरणचे खाजगीकरण होणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे आमच्या संघटनेचा कोणताही कर्मचारी या संपात सहभागी झालेला नाही. आम्ही सर्व कर्मचारी कामावर हजर असून अविरत पणे वीज पुरवठा सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.