700 ते 800 सोसायटींचा आंदोलनाला पाठिंबा
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरून कॉलनी फोरमने आरपारची लढाई सुरू केली आहे.. सिडको वसाहतीमधील सर्व रहिवासी संकुलाच्या गेटबाहेर डबल टॅक्स विरोधात कॉलनी फोरमने बॅनर झळकाविले आहेत. या विषयावरूनच दि.26 आणि 27 रोजी कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड , समनव्यक मधु पाटील, बालेश भोजने, अनिता भोसले, मंगेश आढाव यांनी कामोठे, खारघर येथे लाक्षणिक उपोषणाला बसले होत्या. यावेळी जवळपास खारघर, कामोठे मधील 700 ते 800 सोसायटीने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच रबनव्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला सुद्धा नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
खारघर सेक्टर 12 नवरंग चौकात जनतेला लावलेल्या अवाजवी, बेकायदेशीर, डबल कर वसूल केला जाणार्या मालमत्ता कराबाबत आवाज उठवत लीना गरड या उपोषणाला बसल्या . वारंवार महासभेत विषय मांडूनदेखील प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा आरोप गरड यांनी केला आहे. दि. 24 मार्च रोजीच्या विशेष महासभेत माजी लक्षवेधीदेखील टाळण्यात आल्याचे गरड यांनी यावेळी सांगितले. यामुळेच आता यामुळेच आता लढाई आरपारची असून कॉलनी फॉर्म मालमत्ता कर रद्द केल्याशिवाय थांबणार नाही, म्हणत आम्ही असहकार चळवळ सुरू केल्याचे लीना गरड यांनी सांगितले. तसेच जनतेने घाबरून जाऊ नका लढा फक्त आमचा नाही तर तुमचा सुद्धा आहे असेही मधु पाटील यांनी सांगितले. आम्ही कॉलनीवाल्यांच्या पाठीशी सदैव आहोत मात्र यासाठी तुमचाही सक्रिय सहभाग गरजेचा असल्याचे मत अनिता भोसले यांनी मांडले.
अवाजवी मालमत्ता कराचा 38% दर कमी करून 30% करणे, 38% मधील 12 टक्क्यांचा दुहेरी कर वजा करणे, मागील पाच वर्षांचा सिडको कॉलनी एरियामधून सेवाकर सिडकोला भरलेला असल्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला मालमत्ता कर रद्द करणे, तसेच मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिकेप्रमाणे पनवेल महानगरपालिकेमधीलही 500 चौरस फुटांपेक्षा लहान घरांचा मालमत्ता कर रद्द करणे, महानगरपालिका अधिनियम कलम 129 – अन्वये गावांना जो फायदा दिला, तो फायदा सिडको कॉलनी वसाहतीमधील मालमत्ताधारकांना देणे आदी मागण्या यावेळी उपोषणकर्त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या आहेत.