पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहर व परिसरात महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी आता तिसर्या डोळ्याची नजर रोखून असल्याने आता वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीला लगाम बसणार आहे. शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी नुकतीच पनवेल ज्वेलर्स असोसिएशनची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी व्यापारी बंधूना शहर व परिसरात महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी सी. सी कॅमेरे उभारण्या संदर्भात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला व्यापारी बंधूनी उस्फुर्त प्रतिसाद देत शहरातील मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे उभारण्याचे ठरविले.
यासाठी व्यापारी राजेश मेहता, संजय जैन व निरज कोठारी यांनी पुढाकार घेऊन त्या संदर्भात नियोजन केले. शहरातील प्रवेशद्वारे त्यामध्ये भाजी मार्केट, टपाल नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, कापड बाजार, जोशी आळी, जय भारत नाका परिसर, मोहल्ला परिसर आदींसह अशा विविध ठिकाणी हे कॅमेरे बसण्याचे निश्चित केले. त्या नुसार 30 महत्वाच्या जागा ठरवून तेथे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यासाठी ज्वेलर्स असोसिएशनला जवळपास पाच लाख रुपयांचा खर्च आता पर्यंत आला आहे. या कॅमेरांचा कंट्रोल शहर पोलीस यांच्यासह असोसिएशनच्या तिघांकडे राहणार आहे. त्यामुळे निश्चितच शहरातील गुन्हेगारीला आळा बसणार आहे .
पनवेल शहर व परिसरात महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी सी. सी कॅमेरे उभारण्या संदर्भात पनवेल ज्वेलर्स असोसिएशनला आवाहन केले होते त्याला त्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने निश्चितच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल.
विजय कादबाने
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी नुकत्याच पनवेल ज्वेलर्स असोसिएशनच्या बैठकीत कॅमेरे बसविण्या संदर्भात आवाहन केले होते . त्याला व्यापारी बांधवानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे काम पूर्णत्वास येत आहे. याचा फायदा व्यापारी बांधवाना सुद्धा होणार आहे.
संजय जैन
पनवेल ज्वेलर्स असोसिएशन