। मुंबई । वृत्तसंस्था ।
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट आली असून दिल्लीत पाचवी लाट आली असल्याचे सांगितले आहे. आज जवळपास 10,000 नवे रुग्ण आढळतील आणि पॉझिटिव्ह रेट 10% असेल असं म्हटलं आहे. संपूर्ण देशात कोरोना अत्यंत वेगाने पसरत आहे पण आता तो खूपच सौम्य झाला आहे. त्यामुळे जास्त घाबरण्याची गरज नाही. होम आयसोलेशन आवश्यक आहे असं देखील सत्येंद्र जैन यांनी म्हटलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये आत्तापर्यंत कोविड रुग्णांसाठी 10% बेड होते पण आता त्यांना 40% राखीव ठेवावे असं सांगितलं आहे. सरकारी रुग्णालयातील सुमारे 2 टक्के बेड भरलेले आहेत असं देखील जैन यांनी सांगितलं. दिल्लीमध्ये कोरोना चाचण्या करण्याची क्षमता देखील वाढवण्यात आली आहे. याआधी दिवसाला 50 ते 60 हजार टेस्ट होत होत्या. पण आता दररोज तीन लाख टेस्ट करण्याची क्षमता आहे. तसेच आवश्यक ती पावलं उचलली जात असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.